पंचायत समितीत पत्रकाराशी हुज्जत, मारहाणीचा आरोप; ग्रामसेवकाने नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये पत्रकाराला मागितली जाहीर माफी…
🔷 बावनबीर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर गंभीर आरोप; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, निलंबनाची मागणी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.५.१०.२०२६
संग्रामपूर- बातमीच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालयात गेलेल्या पत्रकाराशी बावनबीर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दीपक जाधव यांनी अरेरावी करत हुज्जत घातली आणि त्यानंतर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास संग्रामपूर पंचायत समिती परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीमध्ये काही पत्रकार बातमीच्या निमित्ताने उपस्थित असताना ग्रामसेवक दीपक जाधव यांनी पत्रकारांना, “तुम्ही पंचायत समितीमध्ये का येता? आमच्यावर लक्ष ठेवता का?” अशा शब्दांत जाब विचारल्याचे सांगण्यात येते. त्यावर पत्रकारांनी आम्ही बातमीच्या कामासाठी येत असल्याचे स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून ग्रामसेवक आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद झाला.
वाद वाढत जाऊन ग्रामसेवक दीपक जाधव यांनी पत्रकार अमोल ठाकरे यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नागरिक, कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाने मागितली माफी
घटनेनंतर उपस्थित नागरिक, कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवक दीपक जाधव यांनी पत्रकार अमोल ठाकरे यांची जाहीर माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची पंचायत समिती परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकाराला बातमीसाठी शासकीय कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर झालेल्या कथित मारहाणीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई होणार का?
शासकीय कार्यालयात पत्रकाराशी अशा प्रकारे वाद घालून मारहाण केल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात आणि ग्रामसेवकावर कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे आता संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















