एफडीएची धडक कारवाई: मुंबईत ५६४ लिटर संशयास्पद दूध नष्ट; ७ आस्थापनांचे परवाने निलंबित…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी,
दि. २५.१०.२६
मुंबई- अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील विविध परिसरांमध्ये दुधाच्या गुणवत्तेसंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबवून ५६४ लिटर संशयास्पद सुटे दूध नष्ट केले आहे. यासोबतच अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील ७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ही कारवाई गोवंडी, मानखुर्द, अँटॉप हिल, चेंबूर आणि धारावी भागात करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर, साठवणुकीच्या अटींचे उल्लंघन आणि अस्वच्छता दिसून आल्याने २५० लिटर दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच मानखुर्द, धारावी व माहिम परिसरातील इतर ठिकाणी दुधाचा साठा जप्त करण्यात आला.
दुसरीकडे, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकत्र साठवणूक, दुधाचा अयोग्य वापर आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने अंधेरी, जोगेश्वरी, ओशिवारा, भायखळा, लोअर परेल आणि शिवडी येथील ७ आस्थापनांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. या मोहिमेत एकूण १.५६ कोटी रुपये किमतीचा माल जप्त व नष्ट करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















