चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०९.२०२०
नागभीड- भारतात प्रथम कोविड रुग्ण ३० जानेवारी २०२० ला केरड राज्यात सापडला होता. नागभिड तालुक्याचा विचार केला तर प्रथम रुग्ण दिनांक ०३ जून २०२० रोजी सापडला.त्यानंतर प्रथम ५० रुग्ण संक्रमित व्हायला ६० दिवस लागले. त्या नंतरचे ५० (५१ ते १००) रुग्ण संक्रमित होण्याकरिता २६ दिवसांचा कालावधी लागला. त्या पुढील ५० रुग्ण (१०१ ते १५०) संक्रमित होण्याकरिता फक्त १३ दिवसांचा कालावधी लागला. आणि सध्या फक्त ५ दिवसात २७ रुग्ण संक्रमित झालेले आहेत.
सांगायचे तात्पर्य हेच की आपल्या नागभिड तालुक्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. सध्या जे रुग्ण संक्रमित झालेले आहेत त्यातील बऱ्याच रुग्णांना लक्षणे दिसून येत आहेत. बऱ्याच रुग्णांचा SpO2 कमी झालेला दिसून येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झालेले असताना आपली मंडळी कोरोना आजाराबाबत अजूनही गंभीर होताना दिसून येत नाही आहेत.एखादा रुग्ण Positive आल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची यादी बनविली जाते त्यांना प्रत्यक्ष आशा सेविका मार्फत टेस्ट करण्याकरिता सांगितल्या नंतर ही काही लोक टेस्ट करण्याकरिता येत नाहीत उलट अरेरावी ची भाषा वापरतात. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी टेस्ट न केल्यास व्हायरस चा प्रसार थांबवणे अशक्य होईल.त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त राहणे आता अत्यावश्यक झालेले आहे. बाहेर पडताना नेहमी मास्क वापरणे, वारंवार साबणाने हाथ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे परंतु प्रत्यक्षात या बाबी होताना दिसत नाही. व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी तील अफवांवर विश्वास ठेऊन नागरिक नियम पाळत नाही तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत नाहीत. परंतु हा व्यवहार आपल्या सर्वांकरिता खुप घातक ठरणार आहे. जितक्या लवकर टेस्ट केली जाईल तितक्या लवकर योग्य औषधोपचार आणि विलागिकरण करून प्रसार रोखता येतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की अजुन वेळ गेलेली नाही आहे प्रशासनाला सहकार्य करा नियम पाळा. ताप, सर्दी, खोकला, नाकाला गंध कळून न येणे, जिभेला चव न लागणे, शरीरात अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित टेस्ट करून घ्यावी. टेस्ट केली तर positive काढतात ही पूर्णतः अफवा असून आता पर्यंत आमच्या द्वारे ३६३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहेत त्या पैकी ३४५८ नमुने Negative आलेले आहेत. अर्थात ९४% नमुने Negative निघाले. रुग्णामध्ये कोरोना आजाराचे संक्रमण असेल तरच टेस्ट positive येणार. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता तपासणी करीता पुढे यावे असे आव्हान नागभिड तालुका आरोग्य अधिकारी डाँ.विनोद मडावी यांनी केले आहे.



















