मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०९.२०२१
मुंबई- राजस्थानमधील जालोरे जिल्ह्यामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात या व्यक्तीचा मुलाला म्हणजेच पीडितेच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या काकूला सांगितला. तिने हा सारा प्रकार सांगतानाचा ऑडीओ शूट करण्यात आला. ही ऑडिओ क्लिप तिच्या भावाने ऐकली. त्यानंतरच त्याने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. ३२ मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र त्याच दिवशी या मुलीच्या भावाने नर्मदा नदीच्या कालव्यात उडी मारुन जीव दिला. संचोरे परिसरामध्ये पीडितेच्या भावाने कालव्यात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचल्याचं समजताच आरोपीने आपल्या राहत्या घरातून पळ काढला. पोलीस सध्या त्याच्या मागावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पीडितेचा जबाब नोंदवण्यात आलाय. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या मुलीने मोबाइल घेऊन देतो असं सांगून आपल्याला कारमध्ये नेलं आणि तिथे वडिलांनीच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगते. मात्र बलात्काराची ही घटना कधी घडली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तसेच या क्लिपमध्ये ही पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या आईने हिच्या भावालाही सोबत घेऊन जा असं आरोपीला सांगितलं होतं मात्र त्याने नकार दिल्याचंही म्हटलं आहे.



















