सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.१२.२०२१
महाबळेश्वर- गेली अनेक वर्षे महाबळेश्वर कडे येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना त्यावर तोडगा निघत नाहीये. यातून महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे महाबळेश्वर रोडवर ‘गुरेघर’ गावच्या हद्दीत असलेल्या मॅप्रो गार्डन या खासगी व्यवसायिक कंपनीच्या जवळ या कंपनीला भेट देणाऱ्या ग्राहकांची वर्दळ वाढत आहे.अफाट जाहिरात केल्यामुळे सर्वच पर्यटक तिकडे आकर्षित होत असल्याने राज्यमहामार्गाच्या दुतर्फा रोजच बेकायदेशीर पार्किंग होत आहे.ऐन हंगामात याचे प्रमाण खूपच जास्त असते. या मॅप्रो कंपनीचे ग्राहक रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा आपली वाहने बेजबाबदारपणे पार्क करत असून त्यामुळे गुरेघर गावच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. सदर समस्या ही अतिशय गंभीर समस्या बनली असून त्यामुळे महाबळेश्वर चे नागरिक व पर्यटक या समस्येने प्रचंड त्रस्त झाले आहेत.तर या ट्रॅफिक “जॅम” ने पर्यटकांचे स्वागत होत असल्याने येणारे पर्यटक नाराज होत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी अपघाताचा धोका देखील तितकाच वाढला आहे. या धनदांडग्या व्यापाऱ्याचे अर्थपूर्ण संबंध पाहता या अडचणींवर संबंधित खात्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास मात्र सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ख्रिसमस हंगाम येत आहे त्यामुळे गुरेघर गावच्या हद्दीत होणाऱ्या ट्रॅफिक अडथळ्या कडे आतातरी शासन लक्ष देणार का ? की धनदांडग्याना वेगळा न्याय आणि सामान्य गरीब जनतेला वेगळा न्याय असा प्रश्न सध्या जनतेला सतावत आहे…? तर येत्या काळात या ट्रॅफिक अडथळ्यावर तोडगा न काढल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना दिली आहे.



















