सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२२
महाबळेश्वर- गेल्या पाच वर्षांपासून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची रंगरंगोटी करावी, स्मारक परिसरात विद्युत रोषणाई करावी, स्मारकाचे तुटलेले संरक्षक कठडे व रेलिंगची दुरुस्ती करावी म्हणून बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने अनेकदा नगरपालिकेकडे मागणी केली होती. पण भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे व तत्कालीन नगराध्यक्षा यांनी या मागणीस जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवली होती. खरं तर अनुसूचित समाजातून जवळ जवळ एकाच घरातले एक नगराध्यक्ष व दोन नगरसेवक महाबळेश्वर नागरपालिकेमध्ये असताना बाबासाहेबांच्या स्मारकाची अशी दुर्दैवी दुर्दशा होणे स्थानिक नागरिकांना अतिशय वेदनादायक होते. परंतु या स्मारकाच्या डागडुजीकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने मात्र जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
यावर्षी १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली होती. या निवेदनास नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व प्रशासक पल्लवी पाटील यांनी योग्य प्रतिसाद देत बाबासाहेबांच्या स्मारकाची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई,डागडुजी अशी महत्वाची कामे करून घेतली. त्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली असून त्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना मात्र जोरदार चपराक बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.



















