सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०६.२०२२
महाबळेश्वर- जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर चा मुकुटमणी असलेला चाईनामन वॉटर फॉल नावाचा नयनरम्य धबधबा महाबळेश्वर नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहराचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी प्लांट नं.१) मध्ये संपुर्ण शहराचे मैलामिश्रित पाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेले जाते परंतु त्या अशुद्ध पाण्यावर शुद्धीकरणाची कोणतीच प्रक्रिया केली जात नाही. पाणी जसे आहे असे म्हणजेच अशुद्ध स्वरूपातच निसर्गात सोडले जाते.असे प्रदूषित पाणी निसर्गात सोडू नयेत असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असले तरी या आदेशाचा खुलेआम अवमान करताना नगरपालिका दिसत आहे. या प्रकरणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने अनेकवेळा नगरपालिका, जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचेकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु त्यावर कसलीच कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. ठेकेदाराने वजन ठेवल्याने सर्व काही सुरळीत असल्याचे रिपोर्ट मिळतात अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अनऑफिशली एका पालिका अधिकाऱ्याने दिली आहे.भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पालिका प्रशासनाकडून या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता मावळली असून अधिकारी मात्र स्वतःची वाह वाह करण्यात व सामूहिक सुट्टीचा आनंद घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.या प्रकरणी वनखात्याने वन गुन्हा दाखल केला होता पण त्यावर देखील ठोस कारवाई न झाल्याने या प्रकाराला चाप बसणार कसा असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. वनखाते देखील रोज वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत असून इतका सुंदर पॉईंट वनखात्याच्या नजरेतून कसा सुटला हा प्रश्न मात्र न सुटणारा आहे. येत्या काळात शासनाने,नगरपालिकेने, वनखात्याने या प्रकरणी कारवाई करावी व चायनामन वॉटर फॉल वाचवा म्हणून महाबळेश्वर बचाव आघाडीकडून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिला आहे.



















