पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि,३.८.२०२४ पुणे- पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील व वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांची भेट घेतली. पुण्यात संततधार पावसाला सुरुवात झाल्यापासून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध रस्त्यांवर कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, पोलिस त्यासाठी काय करत आहेत आणि पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष म्हणून काय करू शकतो. या अनुषंगाने या भेटीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरात वाहतूक शाखेचे पोलिस रस्त्यांवर, चौकांमध्ये वाहतूक नियमनाचे काम करताना प्रामुख्याने दिसले पाहिजेत.
वाहनचालकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे. ट्रॅफिक वॉर्डनही सक्रियपणे रस्त्यांवर वाहतुकीचे नियमन करताना दिसले पाहिजेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासोबतच वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय करण्यासाठी पक्षाचे ५०० कार्यकर्ते जिथे मोठ्या प्रमाणात कोंडी होते आहे, तिथे पोलिसांच्या मदतीला दिले जातील. या कार्यकर्त्यांच्या साह्याने वाहतुकीचे नियमन करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने हा पुढाकार पुणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे घेतला जाणार आहे. त्यावर भेटीवेळी चर्चा झाली. त्याचा आराखडा लवकरच पोलिसांकडून तयार केला जाईल.
शिष्टमंडळाने आपले मुद्दे मांडल्यानंतर स्वतः मनोज पाटील यांनी पोलिसांकडून वाहतूक कोंडीवर काय उपाय योजले जात आहेत आणि येत्या काळात काय केले जाणार आहे, या वेळी तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन्ही स्वरुपांच्या उपायांची पोलिस अंमलबजावणी करणार असल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिली. शिष्टमंडळातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे दिली.
या वेळी शहरातील पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. जवळपास तासभर सर्व बाजूंनी चर्चा झाली आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तातडीने पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.



















