लोहगावसाठी १५० कोटीच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर- आमदार सुनिल टिंगरे
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.११.२०२४
▪️लोहगाव प्रचार फेरीतून नागरिकांशी संवाद
पुणे- लोहगावचा पाणी पुरवठ्याचा प्रश्र्न सोडविण्यासाठी
महापालिकेकडे पाठपुरावा करून १५० कोटींची समान पाणी पुरवठा योजना मंजुर केली आहे. या योजनेचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षभरात लोहगावकरांचा पाणी प्रश्र्न कायम स्वरुपी निघेल असे वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.
आमदार टिंगरे यांनी गुरुवारी लोहगाव भागात प्रचार फेरीतून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पाणी प्रश्नाबद्दल बोलताना ते म्हणाले, लोहगावच्या पाणी पुरवठ्यासाठी भामा आसखेड धरणातून दीड टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या पाणी पुरवठा वितरणासाठी आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्याच्या लाइन टाकल्या गेल्या नसल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. त्यासाठी उपमुखमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिकेकडून लोहगाव- वाघोली साठी तब्बल २३० कोटींची समान पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यात लोहगावसाठी १५० कोटींच्या पाणी पुरवठ्याची कामे होणार आहेत. प्रामुख्याने लोहगाव भागासाठी २०५२ पर्यंतची २ लाख ३२ हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यातून २५० कि.मी. पाण्याच्या लाईन संपूर्ण लोहगाव भागात टाकण्यात येणार असून आतापर्यंत जवळपास ८० कि.मी. पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या आहेत.
याशिवाय १३ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून यासाठीच ५६ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच ३.५ कोटी रुपये खर्चून धानोरीमध्ये २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येत असून हे कामही सुरु आहे. पुढील एक – दीड वर्षांच्या आत या योजनेचे काम पूर्ण करून लोहगावमधील सध्याच्या १ लाख १२ हजार लोकांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.
या प्रचार प्रसंगी माजी सभापती पांडुरंगआप्पा खेसे, लोहगाव ग्रामस्थ व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
———————————————



















