हनुमान कसबा येथे ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वाकोडे (गाळेगावकर) यांच्या हरिकीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१५.०७.२०२६
तेल्हारा- येथील श्री हनुमान कसबा मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिभक्त परायण ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वाकोडे (गाळेगावकर) यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कीर्तनाला वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कीर्तनादरम्यान ह.भ.प. बाळकृष्ण महाराज यांनी आपल्या ओजस्वी व मधुर वाणीमधून व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, आई-वडिलांची सेवा, सुसंस्कार आणि समाजजागृती या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. “दुसऱ्याच्या सुखातच आपले सुख मानावे” हा मोलाचा जीवनमंत्र देत त्यांनी समाजात प्रेम, बंधुभाव आणि सदाचार जोपासण्याचे आवाहन केले.
या हरिकीर्तनासाठी चंदूभाऊ बाभुळकर, राजीव काळे, रामदासभाऊ वाकोडे, विनोदभाऊ सोनोने, मानकर महाराज, बावस्कर महाराज तसेच अन्य गुंजन मंडळींनी उत्कृष्ट साथसंगत केली. त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
यावेळी मंदिर परिसरात असंख्य भाविक, वारकरी, नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, समाजप्रबोधन आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या हरिकीर्तन कार्यक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.



















