भोन ते वसाडी रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; पिवळ्या मातीच्या वापरावरून नागरिक आक्रमक..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.३१.०८.२०२६
🔷 बोडखा-काकोडा येथील नागरिकांनी काम थांबवून संबंधित कर्मचाऱ्यांना विचारला जाब; MSRDCच्या भूमिकेकडे लक्ष
संग्रामपूर- तालुक्यातील नवीन भोन ते नवीन वसाडी या रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला भरावासाठी पिवळ्या मातीचा वापर होत असल्याचा आरोप बोडखा व काकोडा येथील नागरिकांनी केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अत्यल्प खोदकाम करून त्यामध्ये पिवळी माती टाकण्यात येत असून, त्यावर मुरमाचा अत्यल्प थर देण्यात येत असल्याचा दावा नागरिकांनी केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी सुरू असलेले काम थांबवून संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे कामाच्या दर्जाबाबत जाब विचारला.
सध्या कवठळ ते बोडखा रस्त्याचे काम सुरू आहे. कवठळ ते काकोडा तसेच बोडखा रस्त्याच्या दुतर्फा बाजूला आवश्यकतेपेक्षा कमी खोदकाम करून त्यामध्ये पिवळी माती टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर केवळ एक ते दोन इंच मुरूम टाकण्यात येत असल्याने भविष्यात रस्त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या कामात वापरण्यात येत असलेल्या साहित्याबाबत नागरिकांनी आक्षेप घेत काम तात्काळ थांबविले. रस्त्यावर टाकण्यात आलेली पिवळी माती हटवून अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार आवश्यक खोदकाम करावे तसेच निर्धारित निकषांनुसार दर्जेदार साहित्याचा वापर करून काम करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
🔷 अंदाजपत्रकाप्रमाणे काम करा’
रस्त्याचे काम मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसारच करण्यात यावे. कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासावी आणि निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. दर्जेदार काम न झाल्यास रस्त्याचे काम पुढे होऊ देणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला.
यावेळी शिवसेना किसान सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे, राहुल उमाळे, राजेंद्र खारोडे, सदानंद मानखैर, बजरंग दलाचे वैभव ठाकरे, भीमाशंकर कातव, प्रशांत तेल्हाकर, महादेव कोकाटे, भागवत सावरकर, किरण मोहाडे, सागर अढाव, रूपा कौलकार, मंगेश काळमेघ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
MSRDCच्या देखरेखीवर नागरिकांचा सवाल
नवीन भोन ते वसाडी रस्त्याची लांबी जवळपास ३५ किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या कामात पिवळ्या मातीचा वापर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असताना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामाची पाहणी करण्यासाठी नियमितपणे घटनास्थळी उपस्थित राहतात का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात येणारे साहित्य आणि अंदाजपत्रकातील निकष यांची संबंधित विभागाने तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
🔷 कामाच्या माहितीचा फलक नसल्याने संभ्रम
रस्त्याच्या कामासंदर्भात कंत्राटदाराचे नाव, कामाची किंमत, कामाची मुदत, मंजूर आराखडा व संबंधित विभागाची माहिती दर्शविणारा माहिती फलक अद्याप लावण्यात आलेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संबंधित विभागाने कामाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पिवळ्या मातीचा वापर आणि कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी केलेल्या आरोपांची संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे MSRDCच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे.



















