सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी, पांडुरंग राऊत
सातारा, ता. २७ : राज्यातील गावगाड्यामध्ये अत्यंत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या बारा बलुतेदारांना ईश्वर्या आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागास प्रवर्गाअंतर्गत (ओबीसी) स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण देण्यासह नाभिक समाजाला अनुसुचित जातीमध्ये समावेश करावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्यासह शेकडो समाज बांधवांनी आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे कि,राज्याच्या गावड्यात बारा बलुतेदारांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, जागतीकीकरणात व्यवसाय कालबाह्य होत असल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनिय होत चालली आहे. सामाजिक, शैक्षणीक व राजकीय अन्याय त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्यामुळे या बारा बलुतेदारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मायक्रो ओबीसीम्हणून ओबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, चार वर्ष झाली तरी, त्याची पुर्तता केलेली नाही. बलुतेदारांच्या विकासाबाबत एक शब्दही काढलेला नाही. माजी न्यायमुर्ती ईश्वर्या आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचे विभाजन करून बारा बलुतेदारांना स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. त्यावर तातडीने अम्मलबजावणी व्हावी. तसेच बलुतेदारांना व्यवसायासाठी २५ लाख रुपये कर्ज अल्पदराने मिळावे. शासकीय जागेवर चालू असलेल्या त्यांच्या व्यवसायाची जागा त्यांना कायमस्वरूपी मिळावी. बलुतेदारांच्या सात लाख मुलांना प्रशिक्षण देऊन उद्योग उभारण्याची घोषणा पुर्णत्वास न्यावी. शूरवीर जिवा महाले व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे, नगर, गेवराई, लातूर, जळगाव या ठिकाणी अत्याचार झालेल्या मुलींना न्याय मिळवून द्यावा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ, माजी राज्यउपाध्यक्ष शंकर दळवी, जेष्ठ नेते चंद्रकांत जगताप, कार्याध्यक्ष संतोष साळुंखे,सचिव अजित काशीद, उपाध्यक्ष जीवन मसुरकर, प्रमोद इंगळे,बाळासाहेब काशिद,किशोर काशिद, सदाभाऊ सपकाळ, सुरेश पवार, पांडूरंग राऊत, संतोष सपकाळ, राजेंद्र निकम, रविंद्र पवार, बाळासाहेब शिर्के,लक्ष्मण जाधव, सुर्यकांत पानसकर, अजीत पवार, श्रीरंग गायकवाड, रमेश गायकवाड, यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.



















