सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि. ४/३/१९
फलटण,तालुका परिसरामध्ये राजरोसपणे वाळू उपसा, दारू, ताडी, मटका तसेच पानटपरीवरील गुटका हे अवैध धंदे चालू असलेले पहावयास मिळतात. याबत काही सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली पण अजून पर्यंत याचा पाठपुरावा झाला नाही ते धंदे नियमित चालू आहेत. सरडे,राजळे,गुणवरे,मुजवडी या फलटणच्या पूर्व भागात जास्त प्रमाणात हे धंदे आढळून येत आहेत. सरडे गावात हातभट्टी, ताडी यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे येथे काही लोकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील परवानाधारक ढाबा, हॉटेल मध्ये बालकामगार दिसून येतात. ज्यांच्याकडे परवाने नाहीत ते मोठ्या प्रमाणात दारू,गुटका यासारखे अवैध धंदे चालवतात.या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने फलटण शहर उपविभागीय अधीक्षक (DYSP) डॉ. अभिजित पाटील यांना निवेदन दिले. यावर त्वरित कारवाई न केल्यास संघटना राज्य स्तरावर मोठे आंदोलन करेल असा इशाराही संघटनेचे वतीने फलटण तालुका अध्यक्ष गोविंद मोरे यांनी दिला आहे. यावेळी अभिजित भोसले संपादक बहिष्कृत चळवळ,सलीम शेख,किरण मोरे,दत्तू मोरे,आशितोष आढाव,हर्षद आढाव,मनोज भोसले निर्भिड पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.परिसरातील अवैध धंद्यांना लवकरात लवकर आळा घालावा अशी मागणी समाजातील प्रत्येक स्तरातून होत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















