पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अमर सुर्यवंशी
दि.५/३/१९
पिंपरी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरीत मंगळवारी रात्री झालेल्या मेळाव्यात शिरूरमधून इच्छुक असलेले पक्षाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजी केली. त्याचा अडथळा येताच अजितदादा पवार यांनी आपल्या स्टाईलने त्यांचा समाचार घेतला. घोषणा बंद करता की तिकीट कापू असा सज्जड दम त्यांनी दिला. आणि उत्साही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी बंद झाली.अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आज शिरूर लोकसभा मतदारसंघात नारायणगावनंतरचा दुसरा मेळावा भोसरी या भाजपचा बालेकिल्ल्यात झाला. यावेळी अजित पवार यांचा भाजप-शिवसेना, त्यांचे सरकार व कारभारावर हल्लाबोल सुरू होता.त्यावेळी लांडेंचे उत्साही कार्यकर्ते लांडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. त्याचा त्यांना भाषणात अडथळा आला. हे पाहून दादा संतापले.२००९ ला हा तुमचा जोष कुठे होता, अशी विचारणा त्यांनी केली. हा संदर्भ हा त्यावेळी लोकसभेला पक्षाचे उमेदवार असलेल्या लांडे यांच्या संदर्भात होता. त्यावेळी लांडे यांचा पराभव झाला होता. आता, जर घोषणा बंद केल्या नाही, तर तिकीटच कापतो, असे ते म्हणाले. ही मात्रा लागू पडली आणि घोषणा थांबल्या.मात्र यातून लांडे यांना उमेदवारी मिळेल, ही आशा मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांची जिवंत राहिली आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरमधून एक इच्छुक म्हणून नाव असलेले दिलीप वळसे पाटील, मागील लोकसभा निवडणुकीतील या मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम, पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे आदी यावेळी उपस्थित होते.



















