सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२०.०९.१९
फलटण- राज्यातील बहुतांश विरोधी पक्षांनी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे कागदी मतपत्रिकांवर (पेपर बॅलेट) विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली असली, तरी राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येईल, असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान ईव्हीएमवर घेऊ नका.अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आमच्याकडे केली होती.जुन्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, असा विरोधकांचा आग्रह होता.तथापि,कागदी मतपत्रिका आता इतिहास जमा झाल्या आहेत.येथून पुढे ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान होणार आहे. ईव्हीएममधे छेडछाड अशक्य आहे.काही यंत्रात बिघाड होऊ शकतो.पण ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही.यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नाही असे अरोरा म्हणाले.



















