मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.१०.१९
मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. विजय मिश्रा यांनी हि याचिका दाखल केली असून बँकेतील खातेदारांना १०० टक्के संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने एनपीए आणि कर्ज वितरण संबंधी चुकीची माहिती रिझर्व बँकेला सादर केली होती. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे बँकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना सुरक्षा पुरवण्यात यावी आणि त्यांना शंभर टक्के विम्याचे संरक्षण देण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका बिजोन मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने सदर प्रकरणी तात्काळ सुनावणी करण्याची याचिकाकर्त्याची विनंती मान्य करून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. पीएमसी बँकेत ४३५५ कोटीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी खातेदारांची आर्थिक कोंडी झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार कोटी रुपयांचे बेलआऊट पॅकेज जाहीर करावे अशी मागणी खातेदारांनी बुधवारी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास विधानसभा निवडणुकीत नोटा चा पर्याय वापरण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान बँक संचालकांची साडेचार हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले असून त्यातून बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळेल अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती खातेदारांनी दिली आहे. पीएमसी बँकेत अडकलेल्या पैशाचा ताण असह्य होऊन मुंबईत आतापर्यंत तीन जणांचे निधन झालेले आहे. या बँक घोटाळ्यातील एचडीआयएल चे अध्यक्ष राकेश वाधवान व त्यांचा मुलगा सारंग आणि बँकेचे माजी अध्यक्ष वर्यान सिंह यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाच्या बाहेर बँकेच्या खातेदारांनी धरणे आंदोलन केले व बँकेत असलेला पैसा त्वरित मिळावा अशी मागणी केली आहे.



















