रायगड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.१०.१९
रायगड- दिवाळी सण म्हटलं की, खरेदी, फराळ, मिठाई असा खर्चिक सण. आर्थिकदृष्ट्या सधन लोकांच्या तुलनेत मध्यमवर्गीय कुटुंब पैशाचं गणित जुळवून सण साजरे करतात. पण या सर्व धामधुमीत खेडोपाड्यातील आदिवासी समाज मात्र गरिबी अभावी उपेक्षित राहतो. आपणही इतरांप्रमाणे हा दिवाळी सण गोड पदार्थ तसेच फराळ करून साजरा करावा हे त्यांच्याही मनात असतच परंतु आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाला खरेदी तर सोडाच पण साधा दिवाळीचा फराळ देखील नशिबी येत नाही. याच जाणीवेतून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन मधील “युवा एकता प्रतिष्ठान” मधील तरुणांनी आपण देखील या समाजाचे देणेकरी लागतो या भावनेतून गावातील नागरिकांना एकत्र घेऊन आदिवासी समाजासाठी फराळ वाटपाचा संकल्प केला व यासाठी गावातील अनेकांनी पुढाकार घेत आपल्या घरातून फराळ स्वखुशीने लागेल तेवढा फराळ दिला.
दरम्यान, सर्व फराळ एकत्र करून कार्ले येथील आदिवासी वाडी मध्ये वाटप करण्यात आला. साधारण ५० ते ६० घरांमध्ये जाऊन या फराळाचं वाटप करून तेथील लहान मुलांसोबत त्यांच्या आनंदात या सर्व युवकांनी सहभाग घेत भविष्यात या समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला. आदिवासी समाजाकरीता ज्या शासनाच्या योजना असतात त्यांचा लाभ त्यांना मिळवून देणार तसेच त्यांचे आरोग्य, तिथल्या मुलांचे शिक्षण तसेच, इतर अनेक समाजोपयोगी काम हाती घेऊन लवकरच इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणल जाईल अशी खात्री देत ‘युवा एकता प्रतिष्ठान’ ने आदिवासी पाड्यातील कुटुंबियांसोबत दिवाळी सण साजरा केला.



















