सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव दि.९.१२.१९
फलटण- शहरांमध्ये मागील काही दिवसांपासुन चोऱ्यांचे भयंकर प्रमाण वाढले आहे. जिवित व वित्त हानीचा धोका निर्माण झाल्यामुळे फलटण शहरातील नागरिक प्रचंड धास्तावलेल्या व भयभीत अशा मानसिक अवस्थेत आहेत. या अवस्थेत आहेत कारण शहराची कवचकुंडल असणारी सी सी टीव्ही यंत्रणा दुर्दैवाने बंद पडली आहे. कधीही न झोपणारा खरा चौकीदार म्हणजे “सी सी टीव्ही कॅमेरे” हे बंद पडले आहेत.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रसाद काटकर व फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.पोमन यांची शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव शिवसेना तालूका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण येथे भेट घेतली. तेव्हा मिळालेल्या एकंदरीत माहितीनुसार शहरात एकुण ७६ सी सी टीव्ही कॅमेरे चालु होते. पैकी आजमितीला ७४ बंद आहेत, तर केवळ २ कॅमेरे चालु आहेत. सदर सी सी टीव्ही यंत्रणा लोकवर्गणीतुन चालु करण्यात आली होती. नंतरच्या काळात मात्र यावर कोणी फारसं लक्ष न दिल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली.
मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक या दोन्ही सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटुन सदर यंत्रणा चालु करणेबाबत विनंती केली आहे. पोलिस निरीक्षक श्री.पोमन यांनी उद्यापासुन संबंधित व्यक्तीला दुरुस्ती चालु करायला सांगतो असे आश्वासन दिले आहे. तर मुख्याधिकारी श्री.काटकर यांनी दुरुस्ती झाल्यानंतर सर्व सी सी टीव्ही यंत्रणेची देखभाल फलटण नगरपालिका करेन असा शब्द नगरपालिकेच्या वतीने दिलेला आहे.
फलटण शहरातील सध्याच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन व योग्य निर्णय घेऊन मुख्याधिकारी श्री.प्रसाद काटकर व पोलीस निरीक्षक श्री.पोमन यांनी समयसुचकता दाखवली आहे. त्याबद्दल फलटण शहरातील नागरिकांच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांचे अाभार व्यक्त केले जात आहेत.



















