आैरंगाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
🔹 अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरले.
औरंगाबाद- मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे ‘अर्जुन’ अर्थात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे प्रयत्नही निष्फळ ठरल्याचं चित्र आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. सत्तारांसारखेच दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं.
खरं तर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे.
खातेवाटपाआधीच शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
दरम्यान, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा शिवसेनेकडे आलेला नाही. सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नाही, असं सांगितलं जात आहे.
अल्पसंख्याक समुहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपलं राजकीय वर्चस्व कायम राखलं. भाजपऐवजी शिवसेनेत गेल्यामुळे आश्चर्य
गेली अनेक वर्ष आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं होतं. सुरुवातीला विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण आणि शेवटी शेवटी राधाकृष्ण विखे पाटील समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश मिळवून स्वतःची मंत्रिपदी वर्णी लावली. पण अब्दुल सत्तार मात्र भाजपच्या दारावर ताटकळत राहिले. सुरुवातीला अब्दुल सत्तार यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी जास्त आग्रह होता, यासाठी त्यांनी दोन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक वेळा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. पण सिल्लोड मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध केला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला.
महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांना थेट हाताला धरुन यात्रेच्या रथावर खेचून घेतलं, त्यावेळी अब्दुल सत्तार यांचा भाजपप्रवेश नक्की मानला जात होता. मात्र या घटनेनंतर चारच दिवसात अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार सातत्याने निवडून येतात, त्या मतदारसंघात मुस्लिम समाजाची निर्णायक मते आहेत. या मतांना सोबत घेऊन इतर समाजाचा विश्वास संपादन करुन अब्दुल सत्तार हे सातत्याने विधानसभेवर निवडून गेले. पण अब्दुल सत्तार यांनी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधलं.
मुस्लिम मतांच्या जोरावर राज्यात राजकारण करणाऱ्या ‘एमआयएम’ या पक्षाला राज्यात अनेक मुस्लिमबहुल ठिकाणी चांगलं यश मिळालं. पण अब्दुल सत्तार यांच्यामुळे या पक्षाला सिल्लोड मतदारसंघात अजूनही प्रवेश करता आला नाही.



















