कोल्हापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
कोल्हापूर- खासगी सावकारांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लोकांनीही न घाबरता सावकारांविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात खासगी सावकारांच्या पोलीस प्रशासनाकडून मुसक्या आवळल्या जात आहेत. तरीही पोलीसांना सावकारांचा शंभर टक्के बिमोड करता आलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सावकारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेक नागरीक न घाबरता, खाजगी सावकारांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. मात्र काहीजण सावकारांच्या दहशतीला घाबरून तक्रार देत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या अशा खासगी सावकारांवर कडक कारवाई करावी असे आदेश मंत्री सतेज पाटील यांनी दिले.
दरम्यान, करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील पांडुरंग भोसले याची सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्याची चौकशी करून, प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.



















