सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०३.२०२०
पाटण- महाराष्ट्राची जीवनदायीनी असणाऱ्या कोयना धरणचा तालुका म्हणून ओळख असणारा तालुका म्हणजे पाटण तालुका मात्र केरा-कोयनेच्या काठावर असूनही तालुक्याच्या ठिकाणची पिण्याच्या पाण्याची अवस्था मात्र दयनीय आहे. शहरात काही ठिकाणी पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असते हे कमी म्हणून की काय जुना एस. टी. स्टॅन्ड परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा गेले काही महिने चालू आहे. वारंवार नगरपंचायतीला तक्रारी देऊनही पंचायतीने या बाबत कसलीही दखल घेतली नाही. ग्रामस्थ उलटीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. दुर्गंधीयुक्त पाणी स्वयंपाकाला, प्यायला वापरावे लागत असल्यामुळे शेवटी संयमाचा बांध फुटला, त्रस्त नागरिकांनी तेच दुर्गंधी युक्त, गढूळ पाणी बाटल्या, भांड्यात भरून मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांचे केबिन गाठलं. त्यांच्या समोर पाणी ठेवून होणाऱ्या त्रासाची कैफियत त्यांच्या कडे बोलून दाखवली. यावेळी नागरिकांना होणारा उलटीचा त्रास, घरात नळ असूनही पाण्यासाठी नदीला जावे लागणे, व्यावसायिका कडून विकत घ्यावे लागणारे पाणी, धोक्यात आलेले आरोग्य, गंजलेले पाण्याचे पाईप, अगदी कमी येणारे पाणी असा तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. दूषित पाण्याची पाहणी करून मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. येथील पाणी प्रश्नाबाबत कित्येक महिने तक्रार देऊन सुद्धा पंचायतीने कसलीही दखल घेतली नाही. नगरपंचायतीला नागरिकांच्या आरोग्याचे काहीही सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे. निम्या महाराष्ट्राची तहान भागावणाऱ्या कोयणेच्या काठावरच्या तालुक्याची ही अवस्था. आता तरी याची दखल घेतली जाणार का याकडे ग्रामस्थ डोळे लावून बसले आहेत.



















