कराड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०७.०३.२०२०
कराड- कोरोना व्हायरस प्रभावित इराण देशामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील ४४ नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून पुन्हा एकदा विनंती केली आहे.
इराक देशातील करबला शहराला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक इराण मार्गे विमानाने निघाले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे ते नागरिक इराणमध्ये अडकून पडले आहेत. यासंदर्भातील माहिती खा. श्रीनिवास पाटील यांना मिळताच त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी तात्काळ संपर्क साधला.
भारत सरकारकडून कोरोना तपासणीसाठी स्वतंत्र लॅबोरेटरी सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये भारतीयांची तपासणी करून कोरोना बाधितांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात तिथेच ठेवले जाईल. जर त्यांना व्हायरसची बाधा झालेली नसेल तर त्यांना विशेष विमानाने मायदेशी पुन्हा भारतामध्ये आणण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाडून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना भारतात परतण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.



















