सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०३.२०२०
महाबळेश्वर- शहरातील कस्टम ऑफिसच्या बाजूला असणारे भव्य सांस्कृतिक भवन आहे त्या स्थितीत भाडेकरारवर देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.त्याप्रमाणे या प्रकल्पातील बहुउद्देशीय हॉल,खोल्या, सूट, स्वागत कक्ष,स्विमिंग पूल याचे तीन वर्षांचे भाडे ३ लाख ३६ हजार ४१७ रुपये निश्चित करण्यात आले. मे.लँडमार्क इन.प्रा.लि.मुंबई या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.भाडेकरार करून ती मिळकत कंपनीचे संचालक अबू सयान अन्सारी यांच्या ताब्यात देण्यात आली.हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत होता.त्यामुळे भाडेकरार करणाऱ्या कंपनीने स्वखर्चाने हा प्रकल्प पुढील काही महिन्यात पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर भाडेकरार अंमलात येणार हे करारात नमूद होते.
करारानुसार भाडेकरूने पालिकेकडे अनामत म्हणून रुपये २५ लाख ५६ हजार व बँक गॅरंटी ७३ लाख रुपये असे एकूण १ कोटी ६३ लाख रुपये जमा केले होते.करारानुसार भाडेकरूने मुदतीत प्रकल्प पूर्ण केला नाही.मुदतीनंतर पालिकेने भाडे चालू केले.याबाबत पालिकेने वेळोवेळी भाडेकरुस सूचना दिली होती.तसेच भाडे अदा करण्यासाठी देखील सुचविले होते.भाडेकरूने पालिकेला भाडे दिले नाही.त्यामुळे वाद न्यायालयात पोहोचला.गेली काही वर्षे हा वाद न्यायालयात सुरू होता.
याप्रकरणी उच्च न्यायालयाने समन्वयाने मार्ग काढण्यासाठी निवृत्त न्यायाधीश एम.एस.राणे यांची लवाद म्हणून नेमणूक केली.पालिका प्रशासनाने अलीकडे या सुनावणीकडे पुर्णतः दुर्लक्ष केले.आपले म्हणणे देखील न्यायालयासमोर मांडले नाही. १९ ऑगस्ट २०१९ रोजी भाडेकरूने आपण नगरपालिकेला दिलेली बँक गॅरंटीची रक्कम अदा करण्यास हुकूम द्यावा अशी मागणी लवादासमोर ठेवली.याप्रकरणी ११ जानेवारी २०२० रोजी लवादाने पालिकेला लवादासमोर काही म्हणणे मांडायचे नाही असे दिसत असल्याने भाडेकरुस बँक गॅरंटीची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.
आदेश पाहता नगरपालिका प्रशासनाच्या केवळ निष्काळजीपणामुळे संबंधित निर्णय पालिकेच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या नुकसानीस पालिका प्रशासन व सत्ताधारी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.नवीन पालिका बॉडी आल्यावरच नगरपालिकेचे उत्पनाचे स्रोत असलेले वेण्णा लेक पार्किंग, लायब्ररी पार्किंग नागरपालिकेस बंद करावे लागले आहे.तसेच न.पा. उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेले बोटक्लबच्या परवान्याचे नूतनीकरण पालिकेने वेळेत न केल्याने बोटक्लब एन हंगामात पालिकेस बंद ठेवावे लागल्याने देखील पालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.अशातच सांस्कृतिक भवनाच्या संबंधित आलेला निकाल पाहून महाबळेश्वर नगरपालिका ही रामभरोसे आहे का असाच प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
सांस्कृतिक भवनाच्या प्रकरणात शांत राहण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा देखील सुरू आहे.आधीच आर्थिक विवंचनांचा सामना करत असलेल्या नगरपालिकेस हे नुकसान झेपणारे नाही हे मात्र तितकेच सत्य आहे.
सत्ताधारी भाजप निष्क्रिय असून त्यांचे सरकार असताना शहराच्या विकासासाठी ते निधी मिळवू शकले नाहीत.येत्या काळात स्वच्छ भारताच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना पिळून घेण्याखेरीज भाजप सत्ताधारी कोणतेही काम करण्याची सुतराम शक्यता नसून सत्ताधाऱ्यांकडे विकासाची कोणतीच दृष्टी नसून नेतृत्व अनुभव नसणारे व बुद्धीने अपंग आहे अशी खोचक प्रतिक्रिया समाजसेवक व बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली आहे.



















