सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०७.२०२०
पाटण- कोरोना प्रादुर्भावाच्या तीन महिन्याच्या काळात राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवण्यात आली होती आणि अनेकांनी ती भरली. आता ज्या भागात शासनाने परवानगी दिली त्या भागात तीन महिन्याचे प्रत्यक्षात रिडींग घेऊन नागरिकांना बिले पाठवण्यात आली आहेत. ती बिले आकारताना त्यात जुनी भरलेली रक्कम वजा न करण्यात आल्याने प्रचंड रक्कम भरण्यास नागरिकांना सांगण्यात येत आहे त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशातच एकदम तीन महिन्याची वीज बिले आल्यामुळे ही एकरक्कमी रक्कम भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झालेली आहे. इकडे ही समस्या असताना दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांची सुद्धा तीच अवस्था आहे. गेले तीन महिने उद्योग बंद असताना सुद्धा त्यांच्याकडून भरमसाठ वीज बिले आकारण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्यांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. घरगुती ग्राहक आणि उद्योग अशा दोघांची समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सरासरी भरलेले आणि आता तीन महिने एकत्रित बिल यामुळे प्रचंड आर्थिक भार घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांवर पडला आहे. घरगुती ग्राहकांकडून टाळेबंदी च्या काळातील ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यावर कुठलाही निर्णय न घेता सरसकट बिले पाठवण्यात आली आहेत. आपणही जाणताच कि, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातून विविध राज्यातील वीज वितरण कंपन्यांना सुमारे ९० हजार कोटी रुपयांचे कर्ज पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पी एफ सी) आणि रुरल एलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशन (आर ई सी) यांच्यामार्फत उभारण्याची परवानगी दिली आहे. यात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की कोरोनाच्या काळात वसुली होणे शक्य नसल्याने हे लोन अगेन्स्ट रिसिव्हेबल आहे. त्यामुळे ग्राहकांवर ताण न टाकता कंपन्यांना भांडवल उभारता येईल आणि यथावकाश टप्प्याटप्प्याने वसुली झाल्यावर ते परत देखील करता येईल. त्यामुळे ग्राहकांकडून सक्तीने वसुली न करता त्यांच्यावर सरसकट आर्थिक भार न टाकता सुयोग्य मासिक हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची मोकळीक देणे नितांत गरजेचे आहे. यादृष्टीने राज्य सरकार तर्फे त्वरित निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. हा निर्णय तातडीने घेऊन ग्राहकांना दिलासा द्यावा तसेच या आपत्कालीन काळात सर्वसामान्य नागरिकांची ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करून या संकटात ग्राहक विनाकारण महावितरण कार्यालयामध्ये चकरा मारतो आहे यावर तातडीने विचार केला जावा आणि ८ दिवसात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास भाजपा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन शुक्रवार दि.३ जुलै रोजी पाटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उप अभियंता जाधव साहेब महावितरण कार्यालय पाटण, नायब तहसीलदार थोरात साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र मिसाळ, भाजपा हॉकर्स असोसिएशन मुंबई अध्यक्ष सचिन शेजवळ, कामगार संघटना अध्यक्ष दत्ताभाऊ पुजारी, प्रमोद गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



















