अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून २५ हजारची मागणी; सावर्डेतील उपनिरीक्षकाला अटक
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. १.०२.२६
रत्नागिरी- अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून विमा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. संबंधित वारसांना विमा दावा करण्यासाठी आरटीओ तपासणी अहवाल व ‘डीएआर’ (Detailed Accident Report) आवश्यक होते. ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने २५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचला. मागणी केलेल्या रकमेपैकी १५ हजार रुपये स्वीकारताना आरोपीला त्रयस्थ व्यक्तीमार्फत पकडण्यात आले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, दुःखाच्या प्रसंगी असलेल्या कुटुंबीयांकडूनही पैशांची मागणी झाल्याची बाब समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई निर्णायक ठरणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















