हैद्राबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०१.२०२०
हैद्राबाद- आंध्र प्रदेशमधील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने राज्याची विधान परिषदच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना तीन राजधान्या अस्तित्वात आणायच्या आहेत. मात्र त्याबाबतचं विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडलं आहे. त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू यांना धक्का देत विधानपरिषद बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.
वायएसआर काँग्रेसचे आमदार गृडिवादा अमरनाथ यांनी मंत्रिमंडळाने विधानपरिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयला दिली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टी अर्थात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी या विशेष अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे. चंद्राबाबूंनी रविवारी पक्षाची बैठक बोलावून टीडीपीचे २१ आमदार या अधिवेशनावर बहिष्कार घालतील, असा निर्णय घेतला.



















