लातूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२८.०१.२०२०
लातूर- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या उदगीर जिल्हा निर्मितीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल सरकारनं उचललं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या विभागीय बैठकीत सूचना दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष जिल्हा निर्मितीचं स्वप्न पाहाणाऱ्या उदगीरवासीयांसाठी आशेचा किरण निर्माण झालाय.
मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबाद, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आढावा बैठक बोलवली. औरंगाबाद येथे झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लातूर आणि नांदेड जिल्ह्याचं विभाजन करून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देताच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आणि उदगीर येथे प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी दिल्यानं सीमावर्ती भागाला लागून असलेल्या उदगीरच्या जिल्हा निर्मितीची आशा पल्लवीत झाली आहे.
🔳प्रस्तावित जिल्हे
पालघर – जव्हार
ठाणे – मीरा-भाईंदर आणि कल्याण
रत्नागिरी – मानगड
रायगड – महाड
अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
नाशिक – मालेगाव आणि कळवण
बीड – अंबेजोगाई
नांदेड – किनवट
सातारा- माणदेश
पुणे – शिवनेरी
बुलडाणा – खामगाव
यवतमाळ – पुसद
अमरावती – अचलपूर
भंडारा – साकोली
चंद्रपूर- चिमूर
गडचिरोली- अहेरी
जळगाव- भुसावळ
लातूर – उदगीर



















