उस्मानाबाद (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.१२.१९
🔹 भाजप – राष्ट्रवादीकडून अस्मिता कांबळे यांचे नाव आघाडीवर
उस्मानाबाद- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड येत्या आठ जानेवारीला होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष वेधले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी आहे. उस्मानाबाद नगर पालिकेत त्याचा नुकताच प्रत्यय आला आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी २६, काँग्रेस १३, शिवसेना ९, भाजप ४ आणि बंडखोर शिवसेना २, असे संख्याबळ होते. मागील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि बंडखोर शिवसेना यांची आघाडी झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासह एक सभापती पद राष्ट्रवादीला, दोन सभापती पद भाजपला तर एक सभापती पद बंडखोर शिवसेनेला देण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या पदावर भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे यांची कन्या अस्मिता कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसनेच्या बंडखोर सदस्या आणि विद्यमान सभापती चंद्रकलादेवी नारायणकर यांचे नाव दोन नंबरवर आहे. शिवसेनेकडून नितीन शेरखाने यांच्या पत्नी अजंलीताई शेरखाने यांचे नाव पुढे येऊ शकते.
सध्या नेताजी पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्ष अर्चना पाटील या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाकडे ही सत्ता आहे. सध्या आमदार श्री. पाटील भाजपामध्ये आहेत, तर त्यांनी त्यांचा गट राष्ट्रवादीतच ठेवल्याचे दिसुन येत आहे.
माजी आमदार राहुल मोटे पक्षाच्या बरोबर जाणार की, आमदार पाटील यांच्या गटासोबत हे अजुनही गुलदस्त्यात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर हे समीकरण जुळविण्यासाठी अजुनही कोणी पुढे आल्याचे दिसुन येत नाही. त्यातही काँग्रेसचा एक बडा नेता सध्या आमदार पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
🔹 राणाजगजितसिंह पाटील यांची बाजु भक्कम
जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात सध्या तरी राणाजगजितसिंह पाटील यांची बाजु भक्कम दिसत आहे. त्याला छेद देण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील हे कोणती चाल खेळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यानी अजुन कोणतेही पत्ते उघड केलेले नाहीत.
भाजपाच्या चिन्हावर निवडुन आलेल्या चार सदस्यांचे बळ भाजपाचे आमदार श्री. पाटील यांनाच मिळणार आहे. त्यांच्या गटाकडुन अस्मिता शिवदास कांबळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपाध्यक्ष पदासाठी पुन्हा अर्चना पाटील यांचेच नाव पुढे केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडे अध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव पुढे करायचे याबाबतच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. त्यांच्या आघाडीकडे नेत्यांची संख्या अधिक असल्याने पदाच्या वाटपात नेत्यांची चांगलीच कसरत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्तेत जाण्यासाठी हा मोठा अडथळा दिसुन येत आहे.
यंदा राष्ट्रवादीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये प्रवेश राजकीय समीकरण बदलले आहे. राष्ट्रवादीचे २६ पैकी १६ सदस्य भाजपमध्ये गेल्यात जमा आहेत. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या २० झाली आहे. उर्वरित राष्ट्रवादीच्या १० पैकी ६ सदस्य भूम – परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे गटाचे आहेत. शिवसेनेच्या बंडखोरात सुरेश कांबळे यांच्यामुळे एक वाढ झाली आहे. या तीन पैकी दोन सदस्य तरी आ. राणा जगजितसिंह यांच्यासोबत आहेत. बहुमतासाठी २८ सदस्य संख्या लागते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे स्पष्ट आहे.
शिवसेनेचे सदस्य कैलास पाटील आमदार झाल्याने जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ५५ ऐवजी ५४ झाली आहे. तसेच शिवसेनेची सदस्य संख्या ९ वरून आठ झाली आहे. त्यात सुरेश कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या सातवर घसरली आहे. काँग्रेस १३, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी ४ असे गृहीत ठरले तरी महाशिवआघाडीचा प्रयोग उस्मानाबादेत फसणार आहे.
एक तर माजी आमदार राहुल मोटे यांचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्याबरोबर असलेले वैमनस्य आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर असलेले नातेसंबंध यामुळे मोटेंचे सहा सदस्य राष्ट्रवादी मध्येच राहणार असले तरी शिवसेनेबरोबर जाणार नाहीत हे तितकेच खरे आहे.



















