सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
सातारा- काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना कराड तालुक्यातील संदीप सावंत यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवाला आज कराडमध्ये आणले जात आहे. कराडच्या ऐतिहासिक विजय दिवस चौकातून अंत्ययात्रेला सुरवात होणार असून अंत्यसंस्काराची सर्व तयारी झाली आहे. २ जानेवारीला राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कराडचे विरपुत्र संदीप सावंत हे शहीद झाले. सावंत ते कराडमधील मुंडे या गावचे रविवाशी असून गावावर शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्युत्तर देताना सावंत यांना चार गोळ्या लागल्या होत्या. यातच ते शहीद झाले. संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी त्यांचे भाऊ शशिकांत सावंत यांना फोनवरुन देण्यात आली. ही बातमी कळताच सावंत कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दरम्यान, संदीप यांचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तसेच त्यांना अवघ्या दोन महिन्यांची चिमुकली आहे. त्यांच्या जाण्यानं सर्व देश हळहळला आहे.



















