दिल्ली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
नवी दिल्ली- करोना विषाणूने जगभरातील अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केलेला असतानाच आता हे लोण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या विषाणूमुळे चिनी बाजारपेठेतून होणाऱ्या पुरवठ्यात घट झाली असून, देशांतर्गत बाजारातील आणि कम्प्युटरच्या सुट्या भागांच्या किमतीत ५० ते १०० टक्क्यांची वाढ झाली आहे. काही सुटे भाग तर शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. आयातदार आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० मार्चपर्यंत पुरवठा पूर्वत नाही झाला तर, परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. चीनमधील काही शहरांमधून काही प्रमाणात सुट्या भागांची निर्यात सुरू झाली असली तरी, देशांतर्गत ग्राहकांनी ‘वेट अँड वॉच’चा पर्याय स्वीकारल्याने मागणीवर परिणाम होत आहे. नवी दिल्लीतील स्थानिक बाजारपेठांमध्ये कम्प्युटर डिस्प्ले, माउस, की बोर्ड, बॅटरी, चार्जर, मोबाइल कव्हर, स्क्रीन गार्ड, पॉवर बँक, डेटा केबल, इअर फोन, मेमरी कार्डच्या घाऊक किमतीत दीडपट ते दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. दरांमध्ये सरासरी ५० टक्के वाढ ‘ऑल दिल्ली कम्प्युटर्स असोसिएशन’चे सरचिटणीस स्वर्णसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाइल आणि स्मार्टफोन उद्योगातील बहुसंख्य सुटे भाग चीनमधूनच आयात केले जातात. मात्र, सध्या पुरवठा घटल्याने सर्व सुट्या भागाच्या किमतीत सरासरी ५० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पुरवठा घटल्याने विक्रेतेही सुट्या भागांची विक्री वाढवून करीत आहेत. पुरवठ्यावर मोठा परिणाम ‘मोबाइल रिटेलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अरविंदर खुराणा यांनी दिलेल्या माहितीनुसार फोन आणि अन्य वस्तूंच्या सुट्या भागांच्या किमतीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.



















