पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०५.२०२१
पुणे- पुणे जिल्ह्यात कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात कोविड-१९ मुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले असून, या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. करोना प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना,
तसेच कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी राज्यात जिल्हास्तरीय बाल संरक्षक कृती दल गठीत करण्यात आले आहेत.
करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून, त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या टास्क फोर्सच्या माध्यमातून होत आहे.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत असलेल्या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीमार्फत योग्य निर्णय घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांचे आर्थिक, मालमत्ता विषयक व कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.



















