सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०३.२०२०
सोलापूर- सध्या संपूर्ण जगात दहशत माजविणाऱ्या कोरोना व्हायरसची लागण सोलापुरातील एका तरुणाला झाली असून, त्याच्यावर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याच्या अफवेने सोलापूरकर पुरते भयभीत झाले आहेत.
दरम्यान, अश्विेनी हॉस्पिटलने मात्र ही निव्वळ अफवा आहे. तो रुग्ण कोरोनाग्रस्त नसून त्यास न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळी येथील अश्वितनी सहकारी रुग्णालयाच्या लॅबचा बुधवार, 4 फेब्रुवारीचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला. या रिपोर्टमध्ये कोरोना डिटेक्ट झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा रिपोर्ट काही तासांतच संपूर्ण राज्य, देशभर व्हायरल झाला. सोलापुरातही सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोरोनाचीच चर्चा होती.
कोरोनाग्रस्त रुग्ण सोलापुरात सापडल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर झळकल्याने राज्याचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. याची तातडीने दखल घेत मुख्य सचिव अजोय मेहता आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पूर्वी संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी चर्चा केली होती. असा कोणताही रुग्ण नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता व प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना दिली.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्विभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेतली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महानगरपालिका आयुक्तय दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगार, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, अश्विकनी रुग्णालयातील रुग्ण न्यूमोनिया आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट असून त्यांना उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे हलवले आहे, असेही शंभरकर यांनी सांगितले.
अश्विकनी रुग्णालयाचे डॉ. सत्यशेखर पाटील, डॉ. निर्मलकुमार तापडिया, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. उज्वला लोखंडे यांनी रुग्णाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांना माहिती दिली. शंभरकर यांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन रुग्णांच्या संपर्कात रहावे, त्यांना आवश्यक सुविधा मिळतील याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचनादेखील दिल्या आहेत.
‘तो’ रुग्ण कोरोनाग्रस्त नाही- डॉ. घुली
अश्विदनी हॉस्पिटल येथे बुधवार, ४ रोजी दाखल झालेला रुग्ण हा न्यूमोनियाचा होता. त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांच्या विनंतीवरून पुणे येथे त्याला नेण्यात आले आहे. या रुग्णाच्या रिपोर्टमधील कोरोना हा वेगळा आहे. हा रुग्ण नोविल कोरोनाग्रस्त म्हणजे कोव्हिड १९ किंवा एन कोव्हिड १९ बाधित अथवा संशयित रुग्ण नसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी स्पष्ट केले आहे.



















