मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
मुंबई- महामारी बनलेल्या ‘कोरोना व्हायरस’मुळे अवघे विश्व आता भयभीत झाले आहे. जगभरातील अनेक देशांमधील ८५ हजारांहून अधिक लोकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली असून २९०० हून अधिक लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत. ‘कोरोना’चा फटका अर्थातच क्रीडाक्षेत्रालाही बसला असून अनेक मोठमोठय़ा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जपान, कोरियासह तब्बल ५५ देशांना कवेत घेतले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसह ऑलिम्पिक क्वालिफायर्स, फॉर्म्युला वन, बॅडमिंटन, टेनिससह अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन संदिग्ध बनले आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशांनी तर आपल्याकडील स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप रद्द चीनच्या पूर्वेकडील जियांग्सू राज्यातील नैन्जिंग शहरात १३ ते १५ मार्च या कालावधीत वर्ल्ड ऍथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपचे आयोजन होणार होते, मात्र कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तर कोरियात एप्रिलमध्ये होणारी मॅरेथॉन आणि दक्षिण कोरियात होणारी मॅरेथॉनही रद्द करण्यात आली आहे. फॉर्म्युला वन रेसबाबतही संदिग्धता चायनीज ग्रॅण्ड प्रिक्स शर्यतीचे १९ एप्रिलला शांघायमध्ये आयोजन होणार होते, मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या रेसबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया ग्रॅण्ड प्रिक्स व बहरीन ग्रॅण्ड प्रिक्स या स्पर्धाही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. …तर जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार ‘कोरोना व्हायरस’मुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागली तर जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे.



















