सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१७.०३.२०२०
• ३१ मार्च पर्यंत नागरिकांनी कार्यालयात येवू नये आपले अर्ज ई-मेलवर पाठवावे
फलटण- कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणारे अभ्यांगतांचे गर्दीचे नियंत्रण राखणे आवश्यक आहे. यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत अभ्यांगतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात आवश्यकतेप्रमाणे अतितातडीचे काम असेल तर कार्यालयात प्रवेश द्यावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हास्तरावर, क्षेत्रीयस्तरावर सर्वसामान्य जनतेस शासकीय माहिती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी अर्जाद्वारे कार्यवाही करावयाची असेल गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वसमान्य जतनेने शासकीय कार्यालयात न जाता ई-मेलद्वारे अर्ज करावेत व माहिती प्राप्त करुन घ्यावी. यासाठी संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी शासकीय कार्यालयातील ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यासाठी ई-मेल आयडी [email protected] असा आहे. क्षेत्रीय स्तरावरुन अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. सर्वसमान्य जनतेकडून ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जदारांना कळविणे संबंधित शाखा, विभागांची जबाबदारी राहील. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणारे कर्मचारी यांनी काम करत असताना कागदपत्र व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कार्यालयांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरचा, हॅन्डवॉशचा वापर करावा. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयातील कर्मचारी यांनी आपले संकलन, विभागामध्ये स्वच्छता पाळावी.
वैयक्तीक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता त्याला वैयक्तीक हजेरीमध्ये सूट देवून कोरोना संक्रमण पीक कालावधीनंतर त्या सुनावणीस पुढी तारीख देण्यात यावी. वरील बाबींची अंमलबजावणी ३१ मार्च २०२० या कालावधीतपर्यंत करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.
• आठवडी बाजार भरवताना घ्या काळजी
आडवडे बाजार भरवताना मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायतींच्या मुख्याधिकारी व बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
आठवडेबाजारामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कोरोना संसर्ग ग्रामीण भागाकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी स्वच्छता, साफसफाईसह विशेष उपायोजना आखाव्यात. स्वच्छतागृहात हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्यात यावे. आठवडीबाजारामध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी. यामध्ये दर्शनी भागात होर्डिग्ज लावणे, ऑडिओ संदेश, हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचित करावे. आठवडेबाजार झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता मोहिम त्वरीत राबवावी. आठडेबाजारात भाजी, फळे, नाशवंत वस्तू आणि दूध इत्यादी वस्तुंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची खबरदारी घेण्याबाबत सूचित करावे. आठवडा बाजारात शेतकऱ्यांने त्याचे शेतात उत्पादित केलेला भाजीपाला, कडधान्ये, धान्य याचीच विक्री करता येईल. आठवडेबाजारामध्ये त्या परिसरात असणाऱ्या जनरल दुकानातील वस्तुंची वेगळी विक्री करता येणार नाही. (उदा. किराणा साहित्य, खेळण्याचे दुकान, मनोरंजनाचे साहित्य, चैनीचे साहित्य, मांसाहाराचे दुकान इत्यादी), असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.



















