मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.०९.१०.२०२२
नवी मुंबई- न.मुं.म.पा. आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालयीन यांत्रिकी साफसफाई कामातील घोटाळ्यात अडकलेल्या अधिकार्यांची विभागीय चौकशी दहा महिने उलटून गेले तरी प्रशासन विभागाने सुरू केली नाही. नगरविकास विभागाने सदर चौकशीचे आदेश देऊन संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्यास तत्कालीन आयुक्तांना डिसेंबर 2021 मध्ये कळवले होते. आरोग्य विभाग आणि प्रशासन विभाग चौकशी बाबत नकारात्मक प्रतिसाद देत असून घोटाळ्यातील आरोपी मात्र पाच वर्ष मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पालिकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावणार्या अधिकार्यांची विभागीय चौकशी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात यांत्रिकी पद्धतीने रुग्णालयीन साफसफाईच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याचे वृत्त जानेवारी 2018 मध्ये स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. याबाबत शासनाने संबंधित कामाची स्थानिक लेखा निधी विभागामार्फत लेखापरीक्षण करण्याची मागणी तत्कालीन प्रधान सचिव नगर विकास 2 यांच्याकडे करण्यात आली होती. 30 मे 2019 मध्ये नगरविकास विभागाचे अपर सचिव नवनाथ वठ यांनी संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा संचालनालयाला विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश देऊन सदर अहवाल तीन महिन्यात शासनास सादर करण्यास सांगितले होते. 16 डिसेंबर 2020 रोजी सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा यांनी आपला विशेष लेखापरीक्षण अहवाल शासनास सादर करून पालिकेच्या अधिकार्यांवर गंभीर आक्षेप ठेवले आहेत. या अहवालाची दखल घेऊन नगर विकास विभागाने डिसेंबर 2021 मध्ये पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते.
पालिका प्रशासनाने नगर विकास विभागाला पत्र पाठवून सदर आदेशासोबत चौकशी अहवाल पाठवला नसल्याने चौकशी करणे शक्य असल्याचे कळवून शासनास चौकशी अहवाल पाठवण्याची विनंती केली. शासनाने एप्रिल 2022 मध्ये सदर अहवाल पालिकेला पाठवून तातडीने चौकशी पूर्ण करून कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते. सदर अहवाल प्राप्त होऊन पाच महिने उलटून गेले तरी त्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. हा अहवाल आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक दाबून ठेवला असल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे.
तसेच गेली पाच वर्ष घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना अभय देण्याचे काम तत्कालीन आयुक्त रामस्वामी व त्यानंतर आलेल्या सर्व पालिका आयुक्तांनी इमानेइतबारे केले आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील अधिकारी मोकाट फिरत आहेत. लवकरात लवकर या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकार्यांची विभागीय चौकशी होऊन त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी केली असून आयुक्त नार्वेकर त्याला कसा प्रतिसाद देतात त्याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.



















