पुणे : दि.१४.०८.१(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)
दि.१४.०८.१८
पवणानगर परिसरातील तुंग किल्ला येथून ट्रेकिंग करताना इशिता माटे या १५ वर्षीय मुलीचा किल्ल्यावरून खोल दरीत पडुन मृत्यु झाला होता.तिच्या मृत्यु बाबत तीचे वडील मुकुंद माटे यांनी संशय व्यक्त केला होता. इशिताच्या मृत्यु प्रकरणी तब्बल २५ दिवसांनंतर
पगमार्क्स इको टूर कंपनीचे ट्रेक लीडर रवी वैद्यनाथन व संचालक चिन्मय दिवेकर या दोघांच्या विरोधामध्ये भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०४’अ’ नुसार लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये पगमार्क्स इको टूर कंपनीचे ट्रेक लीडर रवी वैद्यनाथन व संचालक चिन्मय दिवेकर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी, कुमारी इशिता मुकुंद माटे,सन सफायर,हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट,पुणे १३ या मुलीने पगमार्क्स इको टूर्स लि. या ट्रेकिंग कंपनीने आयोजित केलेल्या तुंग किल्ल्याच्या ट्रेक ला जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केले होते.त्याप्रमाणे ती दि.१५.०७.१८ रोजी पगमार्क्स कं च्या ऑफिस मधुन इतर ट्रेकर्स सोबत तुंग किल्ल्याच्या दिशेने रवाना झाली.या ट्रेक साठी इशितासह मुंबई व पुणे हुन १४ मुले व मुली सहभागी झाले होते तर रवी वैद्यनाथन हे पगमार्क्स कं. चे प्रतिनिधी व ट्रेक लिडर देखील सोबत होते.किल्ला चढण्यापूर्वी रवी वैद्य नाथन यांनी कोणा कोणाला ट्रेकचा अनुभव नाही हा प्रश्न विचारला होता त्यावेळी इशिताने हात वर करून मी पहिल्यांदाच ट्रेक साठी आले आहे व मला ट्रेकिंगचा अनुभव नाही हे रवी याना सांगितले होते.ट्रेक चालु केल्यावर त्या दिवशी तुंग किल्ला परिसरात मुसळधार पाऊस,वारा,धुके होते तरीही रवी वैद्यनाथन यांनी ट्रेक रद्द न करता सुरूच ठेवला व इशिताचा जीव धोक्यात घातला असे इशिताचे वडील मुकुंद माटे यांनी ‘निर्भीड प्रत्रकारशी’ बोलताना सांगितले. त्याच प्रमाणे ट्रेक साठी तज्ञ, अनुभवी असे प्रशिक्षक पगमार्क्स कंपनीने नेमले नव्हते तसेच ट्रेकर्सना रोप,हर्णेस,हेल्मेट, काठ्या असे कोणतेच ट्रेक करताना आवश्यक असलेले सुरक्षेचे साहित्य पुरविले नव्हते,अवघड ठिकाणी आवश्यक असलेले दोर/रोप बांधले नव्हते,आवश्यक ठिकाणी तज्ञ,अनुभवी प्रशिक्षक देखील नेमले नव्हते.रवी वैद्यनाथन व पगमार्क्स या कंपनीने कोणतेच खबरदारीचे उपाय योजलेले नव्हते.रवी वैद्यनाथन हे ट्रेकर्स सोबत किल्ल्याच्या वरपर्यंत गेले देखील नव्हते.इशिता किल्ल्यावरून खाली पडल्या नंतर तिला वेळेत वैद्यकीय मदत देखील त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे रवी वैद्यनाथन व पगमार्क्स कंपनीचे संचालक चिन्मय दिवेकर यांच्या निष्काळजी पणामुळे माझी मुलगी इशिता माटे हिचा मृत्यू झाला आहे असे तक्रारी मध्ये म्हटले आहे.
दरम्यान दि.०३.०८.१८ रोजी पवणानगरच्या पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी पलांडे व त्यांचे सहकारी,पगमार्क्स चे रवी वैद्यनाथन,साक्षी दिवाण व इशिताचे कुटुंबीय यांनी घटनास्थळी जाऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली असता.इशिता जेथून पडली ती रवी वैद्यनाथन व साक्षी दिवाण यांनी दाखवलेली जागा व इशिताचा मृतदेह सापडलेली जागा यामध्ये तफावत आढळली.त्यामुळे पोलीस कर्मचारी,गावातील ग्रामस्थ,समाजसेवक किरण शिंदे यांनी मिळून पुन्हा किल्ल्यावर जाऊन इशिता कोठून पडली असावी ती जागा शोधून काढली. इशीता कोठून पडली ती जागा लपविण्या मागे रवी वैद्यनाथन व पगमार्क्स कंपणीचा उद्देश संशयास्पद आहे.असेही मुकुंद माटे यांनी म्हटले आहे.
*”मी महाबळेश्वरचा रहिवासी असून तेथील सह्याद्री ट्रेकर्सच्या सोबतीने बरीच मदतकार्य केली आहेत.त्यामुळे मला ट्रेकिंगचा अनुभव आहे. पगमार्क्स कंपनीने ट्रेकिंगला आणलेल्या १४ मुलांना प्रत्येकाकडे वैयक्तिक काळजीपूर्वक लक्ष देऊन सहज सुखरूप खाली उतरविले असते तर हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता.या ट्रेकच्या दरम्यान पगमार्क्स कंपनी च्या प्रशिक्षकांनी ट्रेकर्सना सुखरूप उतरविण्यासाठी रोपचा वापर केला असता तरीही इशिताच्या सोबत घडलेला प्रसंग घडला नसता.त्याचप्रमाणे विपरीत नैसर्गिक परिस्थितीमध्ये ट्रेक करण्या ऐवजी रद्द केला असता तर पुढची हानी निश्चित टाळता आली असती.”*
-किरण शिंदे.(समाजसेवक व ट्रेकर सह्याद्री ट्रेकर्स,महाबळेश्वर)
याप्रकरणी वारंवार विनंती करून देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन घडलेली हकीकत सांगितली तेव्हा पाटील साहेबांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण गुन्हा दाखल करून देखील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत अशी खंत इशिता माटे च्या आईने निर्भीड पत्रकारशी बोलताना व्यक्त केली.
*”इशिता ही अत्यंत गुणी,हुशार मुलगी होती.तीला दहावीच्या परीक्षेत ९०% गुण मिळाले होते.तीने शालेय स्तरावर एक उत्तम वक्ता म्हणून नावलौकिक मिळवला होता इशिताच्या मृत्यूनंतर १ महिन्याने का होईना तीला न्याय मिळणार का ? तिच्या मृत्यूस मारणीभुत अद्याप मोकाट आरोपीना अटक होणार का ? हाच प्रश्न निर्माण होत आहे ?”* -नीलिमा माटे (इशिताची आत्या)
आपल्या मुलांना सुरक्षित घेऊन जाऊन त्यांना सुरक्षितपणे घरी आणून सोडतील याच भरवश्यावर अनेक पालक आपल्या मुलांना अशा ट्रेकिंग कंपन्यांच्या सोबत त्यांनी आयोजित केलेल्या ट्रेक मध्ये पैसे देऊन पाठवत असतात.पण पगमार्क्स कंपनीच्या निष्काळजी पणामुळे इशीताला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे अशा कंपन्यांवर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न जर कोणाच्या मनात निर्माण झाला तर नवल वाटू नये.



















