बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०७.२०२१
आष्टी- जूनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस पडू लागल्याने, शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगलाच पडेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बीयाणे, खते विकत घेवुन बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकविल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आष्टी तालुक्यातील दहा महसूल मंडळातील १२६४२४ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ७०९२३ हे. क्षेत्रावर कापूस, उडीद, तूर, मूग, सोयाबीन, बाजरी, कांदा, कडधान्य आधि खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यात, सर्वत्र मागील आठ, दिवसापासून पाऊसाने दडी मारल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे. आतापर्यत तालुक्यात सरासरीच्या १५० मि.मी पाऊस पडणे अपेक्षित असताना तो अक्षरशः ११० मि.मी इतक्या अल्प प्रमाणात झाला असल्याची माहिती, तालुका कृषीधिकारी श्री.आर. बी सुपेकर साहेब यांनी दिली आहे . तसेच जुलैमध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने मातीत बी- बियाणे टाकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. काहींच्या खुरपण्या पूर्ण झाल्यानं पिके अधिकच सुकू लागले आहेत. तर काहींनी उन्हाचे चटके वाढल्याने खुरपण्या थांबवल्या आहेत. एक तर या वर्षी खत, बी बियाण्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. त्यात ताशी लागलेले पिके ऐन उमेदीच्या काळात पावसाने हूलकणी दिल्यानें पिके करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. चातकाप्रमाणे शेतकरी राजा पाऊसाची प्रतीक्षा करत असल्याचे निदर्शनास येतं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय होऊन दहा जुलैनंतर जर, समाधानकारक पाऊस नाही पडला तर, आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर, निश्चितच पुन्हा एकदा, निसर्गाच्या लहरीपणामुळे दुहेरी मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येतं नाही.



















