पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.१२.२०२०
शिक्रापूर- १ जानेवारी १८१८ रोजी बलाढ्य २८००० पेशवा सैनिकांचा अवघ्या ५०० महार सैनिकांनी भिमा कोरेगाव येथील लढाईत अभूतपूर्व पराभव केला. त्या वीर बहादुर सैनिकांची कीर्ती अमर रहावी म्हणून या महार सैनिकांच्या गौरवार्थ ब्रिटिश सरकारने पेरणे फाटा, भिमा कोरेगाव येथे भव्य “जय स्तंभ” उभा केला. सदर स्तंभ नगर पुणे महामार्गास लागून उभारला आहे. हा स्तंभ जवळ आला आहे हे सहज लक्षात यावे म्हणून भिमा कोरेगाव येथील भिमा नदीवरील जुन्या पुलाच्या सुरुवातीला २ व समाप्तीला २ अशा जयस्तंभाच्या सहज दिसतील अशा प्रतिकृती देखील त्याचवेळी उभ्या करण्यात आल्या आहेत. त्या प्रतिकृती देखील जयस्तंभा इतक्याच ऐतिहासिक आहेत. या चार प्रतिकृती पैकी पुण्याच्या दिशेला जाताना उजव्या बाजूला असणारी प्रतिकृती काही कारणास्तव कोसळली होती. जेव्हा ही बाब बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या लक्षात आली तेव्हा तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी नंदकिशोर राम यांच्याकडे सदर प्रतिकृती पुन्हा उभी करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने दोन वर्षापूर्वी करण्यात आली होती. १ जानेवारी विजय दिनाच्या नियोजन बैठकी मध्ये देखील किरण शिंदे यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निदर्शनास सदर बाब आणुन देऊन संबंधित प्रतिकृती ही ऐतिहासिक असून महत्वपुर्ण आहे व ती शासनाने पुन्हा उभी करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारे संघटनेच्या वतीने नेहमीच सदर प्रतिकृती पुन्हा उभी करण्याची मागणी केली जात होती. उन्मळून पडलेली जयस्तंभाची प्रतिकृती जयस्तंभाच्या अगदी जवळच असल्याने व तिला देखील तितकेच ऐतिहासिक महत्व असल्याने सदर जयस्तंभाची प्रतिकृती पुन्हा उभी करावी या मागणीसाठी किरण शिंदे यांचे सुचने वरून जिल्हाध्यक्ष अमित माने व कोषाध्यक्ष सुमित गायकवाड यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष विकास ओव्हाळ व संजीत खारवे यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग येथे महिन्याभरापूर्वी लेखी निवेदन देऊन सदर प्रतिकृती पुन्हा उभी करण्याची मागणी केली होती. या सततच्या पाठपुराव्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ प्रतिसाद देऊन १ जानेवारी विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर कोसळलेली जयस्तंभाची प्रतिकृती पुन्हा उभी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी केलेल्या या कामाबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी बांधकाम विभागाचे आभार व्यक्त केले आहे तर सततच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याने समाधान मिळाले असल्याचे मत अमित माने व सुमित गायकवाड यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना व्यक्त केले आहे. तर सुस्थितीतल्या चारही प्रतिकृती उभ्या असल्याने स्थानिक नागरिक तसेच समस्त आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदी वातावरण आहे असे मत पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संदीप जोगदंड व पुणे शहराध्यक्ष रघुनाथ कदम यांनी व्यक्त केले आहे.



















