मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०२.२०२०
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी सध्या ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे देखील मागे घेण्याचे काम सुरु आहे.त्याचबरोबर, मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.



















