सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०५.२०२०
महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने आपत्कालीन विभागात (कोरोना वॉरीयर्स) काम करण्यासाठी नेमणूक असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना स्वतःचे कोरोनापासून संरक्षण करण्याच्या हेतूने “हँड सॅनिटायझरचे” वाटप केले आहे.सदर हँड सॅनिटायझर गेल्या आठवड्यात एक व या आठवड्यात एक अशा प्रमाणात प्रती कर्मचारी वाटले गेले आहे.गेल्या आठवड्यात वाटप झालेल्या सॅनिटायझरची किंमत व या आठवड्यात वाटप झालेल्या सॅनिटायझरची किंमत यात मोठी तफावत असल्याचे दोन्ही प्रोडक्टवर चिटकवलेल्या स्टिकर वरून दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात वाटप केलेल्या सॅनिटायझर चे उत्पादन हे “सुपर रब” या नावाचे आहे.त्याची उत्पादन तारीख ०३/२०२० तर एक्सपायरी डेट ०२/२०२२ अशी आहे तर प्रमाण ५०० मिली असून या उत्पादनाची किंमत(MRP) रू.६३०/- इतकी आहे.
या आठवड्यात वाटप केलेल्या सॅनिटायझरची उत्पादन तारीख,उत्पादन,एक्सपायरी डेट,प्रमाण,उत्पादक हे सर्व सारखेच असून किंमत(MRP) मात्र रू २५०/- इतकी आहे.या दोन्ही नगांमध्ये साधारण रू.३८०/- इतकी मोठी तफावत प्रती नग दिसून येते. यामुळे सर्व कर्मचारी गोंधळलेले असून, या प्रकरणी मुख्याधिकारी महाबळेश्वर यांनी खुलासा द्यावा. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी.हे दोन्ही प्रोडक्ट हे दिसायला प्रथमदर्शनी सारखेच आहेत मग हा फरक का ? उत्पादन घेताना योग्य परीक्षण ,चाचणी,चाचपणी केली गेली का ? नगरपालिकेने खरेदी केलेले हे उत्पादन नक्की कोणत्या किंमतीला खरेदी केले ? किंमतीत अशी तफावत खरंच आहे का ? जर असेल तर याला जबाबदार कोण ? खरेदीमध्ये काही घोटाळा झाला आहे का ? प्रोडक्टची प्रत (quality) योग्य आहे ना ? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडले असून मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी चर्चा दबक्या आवाजात होताना दिसत आहे.आधीच स्वच्छ भारत अभियानात महाबळेश्वर पालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत.आता कोरोना आपत्तीच्या वेळी हे प्रकरण समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून याचा खुलासा नगरपालिकेने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.



















