महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाचे बेगडी रूप एक महिन्यातच उघड… याच साठी केला होता अट्टाहास..?
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२०.०६.२०२६
महाबळेश्वर- गेल्या दोन- तीन वर्षांपासून महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये अनेकदा विघ्न आले आहेत.महाबळेश्वरचे नागरिक या बाजारपेठेच्या सुशोभीकरणाकडे चातक पक्षाप्रमाणे डोळे लावून बसले आहेत. पण बाजारपेठेचे काम मात्र हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबतच चालले आहे असाच काहीसा अनुभव इथल्या नागरिकांना आलेला आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी दिला व बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचा आराखडा मंजूर केला.प्रशासनाच्या कालावधीत सवानी कन्स्ट्रक्शन या कंपनीला बाजारपेठेच्या कामाचा ठेका देण्यात आला. एव्हाना सरकार बदलले होते आणि राज्याला नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाभले होते. तदनंतर तो ठेका ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने काढून घेण्यात आला.आता बाजारपेठेच्या विकासाचे काम नगरपालिकेच्या एवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. काम चालू झाले तेव्हा राज्याला तिसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाभले. एकूणच काय पण तीन- तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात देखिल महाबळेश्वरच्या बाजारपेठेचे काम काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. आता सध्या काम पूर्ण झाले असे वाटले पण काम होऊन अजून महिना देखील उलटला नाही तोवर केवळ पर्यटक पायी चालल्यामुळे रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी लावलेले निकृष्ट दर्जाचे दगड जागोजागी फुटलेले दिसत आहेत. तसेच सर्वच दगडी चेंबर जवळ जवळ फुटल्याचे चित्र दिसत आहे. यातून एखाद्या पर्यटकाला दुखापत झाल्यास नवल वाटू नये.पर्यटनाचा उन्हाळी हंगाम जवळ जवळ संपला असून महाबळेश्वरची जनता आता पावसाची वाट पाहत आहे. पण या बाजारपेठेच्या निकृष्ट सुशोभीकरणाच्या कामाला महाबळेश्वरचा पावसाळा झेपेल का असा प्रश्न मात्र येथे चवीने चघळला जात आहे. त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनच्या बाजूला अर्धवट असलेले काम मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. कित्येक ठिकाणी भुयारी गटारांवर टाकलेले लोखंडी आवरण चिंबल्याचे पहायला मिळत आहे. तर. हे झालेले विकासकाम किती दिवस टिकेल हा प्रश्न मात्र बाजारपेठेतील दुकानदारांना सतावत आहे.
दर्जेदार सुशोभीकरणाचे काम झाले नाही तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा महाबळेश्वर बचाव आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिला आहे.



















