सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, महेश दारूंटे
दि.१३.०३.२०२०
• प्राचार्य महालेंसह चौघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले
येवला- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे मतदारसंघात शालेय पोषण आंहार अपहाराची घटना घडली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्याने चौघांसह २ लाख ४७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यहितासाठी शाळांमधून पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांऐवजी या योजनेचे काम पाहणारे शिक्षक, अधिकारी आणि ठेकेदारच अर्थिकदृष्ट्या सुदृढ झाले आहे. विशेषत: मोठ्या शिक्षण संस्थांच्या शासनमान्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे पोषण आहार कागदावर खार्ची टाकून अपहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. परंतु, ठराविक अधिकार्यांच्या अर्शिवादाने पोषण आहाराचा काळाबाजार सर्रास सुरू असतो.
येवल्यातील एन्झोकेम हायस्कुल येथील शालेय पोषण आहार काळाबाजारात विक्री होत असल्याची गुप्तवार्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना मिळाली. बनसोड यांनी, याबाबत मनमाड विभागाचे पोलिस अधिक्षक समरसिंग साळवे यांना याबाबत माहिती दिली. साळवे यांनी सहकार्यांसह सापळा रचला आणि रविवारी, रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एन्झोकेम हायस्कुल आवारात छापा मारून शासकीय योजनेतील शालेय पोषण आहारातील २ लाख ४७ हजार ३०० रूपये किंमतीचे अन्न-धान्य व चिजवस्तू टेम्पोमध्ये विक्रीसाठी जात असतांना रंगेहाथ पकडले. सदर घटना वार्यासारखी शहरभर पसरली. या प्रकरणी गुन्हा दाखल होवू नये, यासाठी स्थानिक स्तरावर काही राजकीय नेतेमंडळी, व्यापारी व पत्रकारांनी पोलिस ठाण्यात तळ ठोकला होता. मात्र, वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यानंतर अखेर सोमवारी, रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येवला पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकार्यांनी शहनिशा केल्यानंतर प्रशांत दौलत गायकवाड यांचे फिर्यादीवरून, एन्झोकेम विद्यालयाचे प्राचार्य दत्तकुमार गुलाबराव महाले (वय ५६), संजय मारूती गायवकवाड (वय ४७), किरण छगन घाटकर ( वय ४३), विलास छगन घाटकर (वय ४६) सर्व राहणार येवला जि. नाशिक यांचे विरूध्द भादवि कलम ४०९, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्राचार्य दत्तकुमार महाले यांनी आपल्या ताब्यातील शासकीय योजनेचे शालेयपोषण आहाराचे अन्न, धान्य व चिजवस्तू या मुलांना आहार तयार करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली असतांना, शालेय पोषण आहाराचे धान्य व वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचविता वॉचमन संजय गायकवाड यांचे मदतीने स्वत:चे फायद्यासाठी व शासकीय पोषण आहाराचे अन्न-धान्य अपहार करून किाराणा व्यापारी किरण घाटकर, विलास घाटकर यांना विक्री केला, असे सदर फिर्यादीत म्हटले आहे. सदर पोषण आहार घाटकर यांचे मालकीचे टाटा टेम्पो क्रमांक एम एच ०२ टी ८५४६ याचेत भरून विक्रीसाठी नेत असतांना २ लाख ४७ हजार ३०० रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चौघे पोलीसांना मिळून आले. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. ए. आठरे हे करीत आहेत.
या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी प्राचार्य दत्तकुमार महाले महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या दैनिकाचा येवला प्रतिनिधी असून मराठी पत्रकार परिषद सलंग्न येवला पत्रकार संघ, येवला आद्योगीक सहकारी वसाहतीसह विविध संस्था-संघटनांचा विद्यमान पदाधिकारी आहे.



















