राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या प्रतीक्षा (वाढीव) यादीवर प्रश्नचिन्ह; ११ पात्र अर्जदारांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१५.०७.२०२६
तेल्हारा- राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजना २०२४-२५ अंतर्गत पात्र ठरलेल्या ११ अर्जदारांनी पंचायत समिती, तेल्हारा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वाढीव (प्रतीक्षा) यादीबाबत आक्षेप नोंदविला आहे.
निवेदनानुसार, शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार अर्जदारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून ११ पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तयार करण्यात आलेल्या वाढीव (प्रतीक्षा) यादीतील काही व्यक्ती इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचा दावा अर्जदारांनी केला असून, संबंधित व्यक्तींची पात्रता शासनाच्या नियमांनुसार तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अपात्र व्यक्तींना लाभ देण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, अकोला), तहसीलदार, तेल्हारा तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासनाचा अधिकृत प्रतिसाद अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर तोही प्रसिद्ध करण्यात येईल.



















