मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
मुंबई- एखादा गुन्हा करून रेल्वेने पळ काढणाऱया गुन्हेगारांची आता खैर नाही. गुन्हेगारांची तत्काळ ओळख पटवून त्यांच्या मुसक्या आवळता याव्यात म्हणून रेल्वेने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रत्येक स्थानकात चेहरा ओळखणारे अत्याधुनिक कॅमेरे असलेली यंत्रणा (फेशियल रेकग्नायझेशन सिस्टम) लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात म्हणजे जूनअखेरपर्यंत मुंबईसह देशभरातील १७ शहरांमधील तब्बल ६१०४ रेल्वे स्थानकांत कॅमेरे लावले जाणार आहेत. तसेच २०२० पर्यंत सर्व स्थानकांतील स्टेशनवर फेशियल रेकग्नायझेशन सिस्टम असलेले कॅमेरे लावले जाणार आहेत. सध्या ए-वन गटातील स्थानकांवर ९२ कॅमेरे लावले जाणार असून बी गटातील स्थानकांत ३८, सी गटातील स्थानकांत २६ तर डी आणि ई गटातील स्थानकांत १० कॅमेरे लावले जाणार असून ते फेशियल रेकग्नायझेशन सिस्टमला जोडले जाणार आहेत.



















