मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०७.२०२१
मुंबई- कार्यालयीन उपस्थितीत झालेली वाढ आणि लोकल प्रवासाची मुभा नसल्याने सर्वसामान्यांचे रस्ते प्रवास करताना होणारे हाल यामुळे अनेकजण उपनगरीय लोकलने विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर १ लाख २ हजार ३४२ प्रवाशांना, तर पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर २९ हजार ५५५ प्रवाशांना विनातिकीट पकडण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यात बहुतांश सामान्य प्रवासी आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्पच असते,
असे सांगण्यात आले. सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्याने ते रेल्वेप्रवासाचा प्रयत्न करतात. त्यामुळे पकडण्यात येणाऱ्या या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच सुरू असलेल्या लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर तैनात नसलेले पोलीस ओळखपत्रे तपासून प्रवाशांना स्थानकात सोडत नाहीत. त्याचबरोबर काही स्थानकात तिकीट देतानाही ओळखपत्र तपासले जात नाही. तर काहीजण तिकीट दिले जाणार नाही, म्हणून विनातिकीच प्रवास करतात. परिणामी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले. एप्रिल २०२१ ते जून २०२१ या तीन महिन्यात तब्बल १ लाख ३१ हजार ८९७ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसेच दोन महिन्यांत ४ हजार ओळखपत्र रेल्वेने जप्त केली आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर १४ एप्रिल २०२१ पासून सर्वसामान्यांना पुन्हा लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एप्रिल महिन्यात ८,२२८ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती.



















