सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०८.२०२०
महाबळेश्वर- श्रीमती आयशाबी हसन हरीमुळे या वृद्ध महिलेच्या कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनीवर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी विनापरवाना प्रवेश करून शेतीसाठी अवजारे ठेवण्यासाठी बनविलेले पत्र्याचे शेड मोडले तर सत्तर वर्षांपासून घाम गाळून मशागत केलेल्या शेतजमिनी मध्ये खड्डे मारून सदर शेतजमीनीचे अपरिमित नुकसान केले असल्याची तक्रार आयशाबी हसन हरीमुळे मु.पो.माचुतर ता.महाबळेश्वर या गावातील गरीब,भूमिहीन महिला शेतकऱ्याने केली आहे.
या बाबतची अधिकची माहिती अशी की,आयशाबी हसन हरीमुळे यांचे सासरे ब्रिटिश सरकारच्या काळात माचुतर येथील सर्व्हे नं. १३ ब ही जिरायत शेतजमीन कसत होते व त्यातून आपल्या परिवाराची मोठ्या कष्टाने पिक पिकवून गुजराण चालवत होते.त्यांचे नंतर आयशाबी यांचे पति हसन हरीमुळे हे तीच जमीन वंशपरंपरेने कसून आपल्या कुटुंबाची गुजराण करत होते.दरम्यानच्या काळात १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला.परंतु या गरीब,अशिक्षित शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दुर्दैवाने वनखात्याचे नाव नोंदले गेले तर इब्राहिम हसन हरीमुळे यांचे कुळ व इतर अधिकारात नाव नोंदले गेले.त्यांचे नंतर त्यांचा मुलगा व आयशाबी यांचे पति हसन हरीमुळे यांचे नाव महसूल खात्याच्या रेकॉर्डला लागले.१९५२ साली जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश देऊन सदर शेतजमीन इब्राहिम हरीमुळे यांना शेती प्रयोजनासाठी दिली.तेव्हा पासून आजपर्यंत सदर शेतकरी कुटुंब ही शेतजमीन कसत असून जुने ७/१२ व ८अ च्या रेकॉर्ड वर इब्राहिम हरीमुळे व त्यांचे नंतर हसन हरीमुळे यांचे नाव असल्याचे पुरावे,त्यांनी वेळोवेळी शासनास दिलेल्या शेतसाऱ्याचे पुरावे आयशाबी यांनी तहसीलदार महाबळेश्वर, पोलीस निरीक्षक महाबळेश्वर यांना दिलेल्या तक्रारींमध्ये सुपूर्द केले आहेत.
दि.०५.०८.२०२० रोजी २० ते २५ वनकर्मचारी यांनी आयशाबी कसत असलेल्या शेतजमिनीमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून या गरीब,असहाय, वृद्ध,महिला शेतकऱ्याचे आपल्या शेतीत शेतीची अवजारे ठेवण्यासाठी बांधलेले पत्र्याचे शेड निर्दयीपणे मोडले व शेतजमिनीत खड्डे खोदले त्यामुळे शेतजमिनीचे पर्यायाने आयशाबी यांचे मोठे नुकसान झाले आहे.तरी सदरचे अनधिकृत कृत्य करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी या वृद्ध महिला शेतकऱ्याने शासनाकडे केली आहे.
सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.गेल्या चार महिन्यापासून जनतेला रोजगार नाही.देशात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे.महाबळेश्वरच्या जनतेला तर याचा सर्वाधिक फटका बसला आहे.अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी राममंदिराची अयोध्येत पायाभरणी केली गेली त्याच दिवशी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कृत्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा संघटना या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व त्यांचेवर झालेल्या अन्याया विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किरण शिंदे यांनी दिली असून सदर अन्यायकारक घटनेचा तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
वास्तवात महाबळेश्वर मध्ये अनेक धनदांडगे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून मोठं मोठे इमले बांधत असल्याचे अनेक प्रकार समोर येऊनही गांधारीच्या भूमिकेतील वनखाते गरीब शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.तर आम्हाला खरच स्वातंत्र्य मिळाले आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.



















