नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०४.२०२०
नाशिक- शहरात कोरोना कोविड – १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही याची दक्षता नाशिक महापालिकेच्या माध्यमातून घेण्याच्या सूचना मा . स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिले. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती कार्यालयात स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी वैद्यकीय विभागाचे डॉक्टर अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती . करोना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने विविध उपाय योजना करून कोरोना कोविड-१९ प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत सर्वतोपरी नियोजन करण्यात यावे या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत मनपाकडे असणारी साधनसामग्री कमी प्रमाणात असून ती आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून घ्यावी जेणेकरून त्याबाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच दवाखान्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना, नर्सेस, डॉक्टर यांना पी.पी. इ. कीट उपलब्ध करून देणे आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वैद्यकीय विभागास आवश्यक अशी साधनसामग्री देखील त्वरित उपलब्ध करून घ्यावी. यासाठी विविध उपाययोजना वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात करण्यात याव्या त्यासाठी सी.एस.आर. निधीवर अवलंबून न राहता अत्यावश्यक बाब म्हणून तात्काळ अल्पमुदतीच्या निविदा काढण्यात येऊन कार्यवाही करावी. त्यास स्थायी समितीची मान्यता हवी असल्यास ती तात्काळ देण्यात येईल. तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक शहरात एक मोठे विशेष असे संसर्गजन्य रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून त्याला गती द्यावी अशा सूचना या बैठकीत दिल्या . याबैठकीस अतिरिक्त आयुक्त बी . जे. सोनकांबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रंबके, डॉ. कल्पना कुटे, डॉ.अजिता साळुखे, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.



















