सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि०९.०१.२०२१
महाबळेश्वर- शासकीय भूखंडांवर अतिक्रमण करून,त्यावर बेकायदेशीर झोपड्या मारून, त्या झोपड्यांची बेकायदेशीर विक्री करून, लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या टोळीची शहरात जोरदार चर्चा आहे. ही टोळी शहरातील मोकळ्या, मोक्याच्या जागा हेरून त्यावर अतिक्रमण करून मग त्याची परस्पर विक्री करून मोठी माया कमावत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, झोपडपट्टी नावाने एका संघटनेचे नाव सांगून, एका विशिष्ट जातीचे लेबल वापरून, लोकांना धमकावून, खोट्या केसेसची धमकी देऊन,गुंडगिरी करून शासकीय व बिगर शासकीय भूखंड या टोळीकडून बळकावला जातो. या टोळीचा म्होरक्या हा झोपडपट्टी गुंड असून,त्याचे वडील नगरपालिकेमध्ये बांधकाम विभागात मुकादम असल्यामुळे आपल्या वडिलांच्या वजनाचा वापर करून सदर व्यक्ती शहराबाहेरील काही गुंडांना सोबत घेऊन शासकीय भूखंडांवर बिनधास्त, बेकायदेशीर ताबा मारत आहे.व त्यानंतर सदर जमिनीवर झोपड्या उभारून त्याची बाहेरच्या नागरिकांना, परप्रांतीयांना परस्पर बेकायदेशीर विक्री करून त्यातून लाखोंची माया कमावत आहे. या व्यक्तीने शहरातील अनेक नागरिकांकडून तुम्हाला घर देतो म्हणून पैसे उकळले आहेत. त्यानंतर बनविलेल्या झोपडीला लाईट देतो,पाणी देतो म्हणून देखील हजारो रुपये लुटल्याची चर्चा आहे.अशा प्रकारे शहरातील शेकडो नागरिकांची फसवणूक या टोळीकडून झाल्याचे बोलले जात आहे.
आज पहाटे पहाटे शासनाच्या सि. स. नं. ८४ मध्ये या टोळीने राखीव जंगलाची बेकायदेशीर कत्तल करून अनधिकृतरित्या प्लास्टिकच्या कागदाची झोपडी उभी केली असून सदर जागेचा बेकायदेशीर ताबा मिळवला आहे.हा सर्व धक्कादायक प्रकार घडताना निर्भिड पत्रकारच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे सदर प्रकरण उजेडात आले आहे.
सर्व्हे नं.८४ हा शासनाच्या नावे नोंद असून त्यावर राखीव वनांची नोंद आहे.तर नगरपालिकेने सदर भूखंडावर एस टी पी प्लांट साठी आरक्षण ठेवले आहे. सदर जागेमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून चव्हाण कुटुंब राहते तर काही वर्षांपासून एक अजून शेड अस्तित्वात आहे. पण सदर जागा ही मोकळी असल्याने या टोळीच्या ते लक्षात आले असून आज या जागेवर त्यांनी बेकायदेशीर ताबा मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी तहसीलदार कार्यालय व नगरपालिका काय कारवाई करणार ? की सदर टोळीचा म्होरक्या आपल्या नगरपालिकेत नोकरीस असलेल्या वडिलांना मध्ये घालून सर्व अधिकाऱ्यांची तोंडे बंद करणार असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
या टोळीने व्हॅली व्ह्यूव या हॉटेलच्या बाजूला अशीच बेकायदा झोपड्या मारून मोठ्या प्रमाणात विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार करून लाखोंचा घोटाळा केल्याची बाब समोर येत असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून या टोळीला जेरबंद करण्याची मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून ज्या ज्या नागरिकांना या टोळीने गंडा घातला आहे,फसवणूक केली आहे त्यांनी तात्काळ पोलिसांशी अथवा आमच्याशी कायदेशीर मदत मिळण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी निर्भिड पत्रकारशी बोलताना केले आहे.
एकीकडे शहरवासीयांना राहण्याची जागा उपलब्ध नाहीये. अशातच जनतेला सेवा,सुविधा देण्यासाठी नगरपालिकेकडे देखील जागा उपलब्ध नसताना शासकीय जागा गुंडगिरीतून बळकावण्याचा व त्याची विक्री करण्याचा प्रकार खुपच गंभीर असुन शासन यावर काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



















