“सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे ?”
नारायण राणेंचा सरकारला परखड सवाल !
मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२१
सचिन वाझे प्रकरणावरून राज्यात निर्माण झालेलं राजकीय वादळ शमण्याची कोणतीही चिन्ह दिसून येत नाहीयेत.
या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.
त्यासोबतच आता नारायण राणेंनी देखील आपल्या शैलीमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, आपल्या टिकेसाठी त्यांनी संजय राऊत यांच्याच रोखठोक लेखाचा आधार घेतला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. “मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेबद्दल असं काय प्रेम आहे ? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही ? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे ?”, असे परखड सवाल नारायण राणेंनी विचारले आहेत. काय आहे ‘रोखठोक’ लेखामध्ये ? सचिन वाझे प्रकरणापासून टीकेच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक स्तंभातून मोठा गौप्यस्फोट केला होता. “अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा शरद पवारांनी हे पद अनिल देशमुखांकडे दिले”, असं या लेखात म्हटलं आहे. तसेच, “सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले.
पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा चौकशीचा विषय आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता,
तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?”



















