फलटण : (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क: गोविंद मोरे)दि.०४.०७.१८ मोरे वस्ती,सरडे बंगला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत गेली २ वर्षांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे.जुलै २०१७ मध्ये तत्कालीन मुख्याध्यापक धुमाळ यांनी व विद्यमान मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हराळे यांनी अनेक वेळा ग्रामसेवक,सरपंच,गट शिक्षणाधिकारी,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे लेखी अर्ज करून शाळेच्या छताची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.शाळा कमिटीचे अध्यक्ष किरण मोरे यांनी देखील सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या शाळेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची खंत निर्भीड पत्रकारच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.या प्रकरणी किरण मोरे यांचे प्रयत्नातून ग्रामपंचायतीने शाळेचे छत दुरुस्ती बाबत ठराव मंजूर केला आहे पण आजवर कार्यवाही मात्र काहीही होऊ शकली नाही. सदर शाळेचे छत पूर्णपणे फुटलेले असून ते धोकादायक स्थितीमध्ये आहे.पाऊस चालू झाल्यास वर्गात पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते शिवाय मुलांना भिजण्या शिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. विद्यार्थ्यांना आपले बेंच व पुस्तके वाचविण्यासाठी नेहमी आडोसा शोधावा लागतो.ही कसरत जीवघेणी आहे.शिवाय येत्या पावसाळ्यात जर हे विद्यार्थी पावसात भिजले तर त्यांचे आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो तसेच हे छत कोसळल्यास मोठी हानी होऊ शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. लवकरात लवकर शाळेचे छत दुरुस्त केल्यास पुढील धोका टळू शकतो तरी प्रशासनाने त्वरित छताची दुरुस्ती करून चिमुकल्यांच्या जिवाशी चालविलेला खेळ थांबवावा अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.



















